नागपूर-गोवा अंतर ‘शक्तिपीठ एक्स्प्रेस वे’ने ८ तासांत गाठता येणार

नागपूर-गोवा अंतर ‘शक्तिपीठ एक्स्प्रेस वे’ने ८ तासांत गाठता येणार

पणजी : पुढारी वृत्तसेवा, नागपूर आणि गोवा यांना जोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तिपीठ एक्स्प्रेसवेची घोषणा केली. या एक्स्प्रेस वे मुळे या दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाचा वेळ 21 तासांवरून 8 तासांवर येईल, असे सांगितले जात आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, कोकण हे तर जोडले जाणार आहेत; पण तिथूनही पुढे गोव्यापर्यंत हा एक्स्प्रेस वे असणार आहे.

हा महामार्ग भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली. या एक्स्प्रेस वे मुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील 3 शक्तिपीठे, 2 ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे जोडली जातील. यामुळे नागपूर ते गोवादरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 10 तासांनी कमी होईल. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेस वे ची लांबी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेपेक्षा जास्त असेल. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ आधीच कमी झाला आहे. शक्तिपीठ द्रुतगती मार्ग 11 जिल्ह्यांतून धावणार आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला चालना मिळणार आहे.

शक्तिपीठे जोडणार

वर्ध्यातील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी या शक्तिपीठांना याद्वारे जोडले जात आहे. याशिवाय तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर ही शक्तिपीठे, अंबेजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, गुरुद्वारा सचखंड श्री हजूर साहिब आणि प्रधानपूर येथील विठ्ठल कुमारी यासह इतर तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. यामुळे या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग हे नाव दिले गेले आहे. शक्तिपीठांसह विविध धार्मिक स्थळे जोडली गेल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

वेळेची बचत

एक्स्प्रेस वेने प्रवासाचा वेळ सरासरी 18 ते 21 तास लागतात. त्यावरून हा प्रवास आता केवळ 8 तासांवर येऊ शकतो. प्रवासाचा वेळ 13 तासांनी कमी होणार त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी तो गेम चेंजर ठरेल.

ही पर्यटनस्थळे जोडणार

सेवाग्राम, कारंजा लाड, माहूर, औंढा, नागनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड, परळी वैजनाथ, अंबागोगाई, लातूर, उस्मानाबाद, अंबाबाई कोल्हापूर, संत बाळूमामाचे आदमापूर, कुणकेश्वर,पत्रादेवी

गोव्याला होणार लाभ

या एक्स्प्रेस वे मुळे गोव्यातील मालमत्तांच्या किमतीतही वाढ होईल. तसेच, गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. कारण लोक 8 तासांत रस्त्याने प्रवास करून गोव्यात पोहचू शकतील.

द्रुतगती मार्गाचे फायदे

व्यापारवाढ, आयात-निर्यात वाढीस मदत धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांना वगळून गोव्याकडे जाण्याचा पर्यायी मार्ग जलद वाहतूक, नागपूर ते गोवा प्रवासाला केवळ 8 तास लागतील. सध्या 21 तास लागतात. ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प असल्याने हजारो झाडे महामार्गालगत लावली जातील. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

  • भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग
  • लांबी 760 किलोमीटर सहा पदरी द्रुतगती मार्ग
  • प्रकल्पाची अंदाजित किंमत 75,000 कोटी
  • प्रवासाचा कालावधी- नागपूर ते गोवादरम्यान 8 तास. प्रवासाचा वेळ 13 तासांनी कमी होणार.
  • मालकी- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
  • कधी पूर्ण होणार – तारीख निश्चित नसली तरी हा एक्स्प्रेसवे 2028 किंवा 2029 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news