नागपूर : कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; १० दिवसात तिसरी घटना

file photo
file photo

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी नागपूर शहरालगत वाघाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली होती. आता गोंदिया वनविभागात येत असलेल्या पालांदूर वनक्षेत्रात शनिवार (ता.२९) पुन्हा एका वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, वन्यजीव प्रेमींनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ विदर्भात असल्याची नोंद आहे. असे असले तरी वाघांच्या मृत्यूचा आलेखसुद्धा तेवढ्याच वेगाने वर जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढत असताना गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघ नवेगाव-नागझिऱ्यात सोडण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. तर आता आणखी दोन वाघ सोडण्याच्या हालचाली संबंधित वनविभागाकडून सुरु आहेत. अशात वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनविभाग व वन्यजीव विभागात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून, अवघ्या दहा दिवसात विदर्भात तीन वाघ मृत्यूमुखी पडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

यात २१ मार्च रोजी नागपूर शहराजवळील रुई गावात वाघाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या वाघाच्या डोक्यावर व पोटाजवळ मार लागले होते. तर त्याची दोन नखे देखील गायब होती. दरम्यान, वनखात्याने नैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर २७ मार्चला भंडारा वनविभागाअंतर्गत लेंडेझरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९ मध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत होते. मात्र, डोक्याला आणि मागच्या पायाला जखम होती. येथेही नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर आता गोंदिया वनविभागात दक्षिण देवरी वनक्षेत्रातील पालांदूर जंगल क्षेत्राजवळ वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, या तिन्ही घटनांपैकी एका घटनेत वाघ पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता, तर एका घटनेत तो अर्धवट कुजलेल्या अवस्थेत होता. त्यावरुन वाघाचे मृत्यू हे दहा दिवसांपूर्वीचे असल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही वनखात्याला त्याची भनकही लागली नाही. मात्र, या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून वनविभागाच्या गस्तीवर व कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जंगल परिसरात आग लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकाला वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी नैसर्गिक मृत्यू असल्याचे दिसून येत आहे. तर वाघाचे सर्व अवयव शाबूत आहेत. दरम्यान, अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे.
– प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक, गोंदिया

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news