मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा – 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम 15 एप्रिल ते 2 मे या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा निवडणूकीमुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी, MPSC ) ने दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा – 2022 च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. (MPSC )