खासदार हेमंत पाटील मुंबईत तळ ठोकून; ३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना

खासदार हेमंत पाटील मुंबईत तळ ठोकून; ३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना
Published on
Updated on

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडून होत असलेल्या विरोधामुळे उमेदवार बदलाच्या चर्चेला तोंड फुटल्याने शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे मुंबईत तळ ठोकून आहेत. मंगळवारी सकाळी हिंगोली लोकसभा मतदार संघातील तब्बल 300 गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 9 वाजता भेटीची वेळ दिल्याने रात्री कार्यकर्त्यांची मते ते जाणून घेणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत हेमंत पाटील हेच महायुतीचे उमेदवार राहतील अशी शक्यता व्यक्‍त केली जात आहे. भाजपचा विरोध मावळल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीने चार दिवसांपुर्वीच विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. खासदार पाटील यांनी प्रचारास सुरूवातही केली होती. परंतू भाजपने हिंगोली लोकसभा मतदार संघाची मागणी लावून धरली. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवित एकतर उमेदवार बदलावा किंवा लोकसभेची जागा भाजपला सोडावी अशी मागणी सोमवारी नांदेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने केली. परंतू फडणवीस यांनी हिंगोलीची जागा शिवसेेनेचीच असून आपण युतीचा धर्म पाळावा असा सल्‍ला भाजपच्या शिष्टमंडळाला दिला. त्यामुळे शिष्टमंडळ हिंगोलीला परतले. परंतू उमेदवारी बदलीच्या चर्चेला उत आल्याने कोणताही धोका पत्करण्यास हेमंत पाटील तयार नसल्याने त्यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांनी सोमवारी सकाळी अडीचशे ते तीनशे गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला. यामध्ये प्रामुख्याने कळमनुरीचे तालुकाप्रमुख जयदिप काकडे, वसमतचे तालुकाप्रमुख राजू चापके, हिंगोलीचे शहरप्रमुख अशोक नाईक, तालुकाप्रमुख प्रताप काळे, सेनगावचे तालुकाप्रमुख रामप्रसाद घुगे, उपजिल्हाप्रमुख ब्रम्हानंद नाईक, अमोल खिल्‍लारी, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, रामेश्‍वर शिंदे, सुशिला आठवले, सारिका चांदणे, मीना गडदे, निर्मला पाटोळे, मच्छिंद्र सोळंके, रामकिसन झुंझूर्डे, प्रभाकर क्षिरसागर, गोविंद नादरे यांच्यासह हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्कलप्रमुख, गणप्रमुख, बुथप्रमुख, शिवदूत आदींचा समावेश आहे.

हिंगोलीची जागा जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवार बदलीची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या इच्छुकांचाही विरोध मावळल्याचे चित्र आहे. परंतू वरिष्ठ स्तरावर होत असलेल्या वेगळ्या चर्चेच्या पार्श्‍वभुमीवर हेमंत पाटलांसह त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांना दिलासा मिळेल. या भावनेतूनच समर्थक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे. गुरूवारी हेमंत पाटील हे मोठे शक्‍तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरतील असे स्पष्ट होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news