पुढारी ऑनलाईन डेस्क : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी (दि.९) रात्री भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी होती. याचे हादरे काही सेकंदापर्यंत जाणवत होते. मोरोक्कोतील मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या १,००० च्या वर पोहचली आहे. मोरोक्कोतील लोकांनी मॅराकेचमधील जुन्या शहराभोवती लाल भिंतींचे ढिगारे, धूळ आणि खराब झालेल्या इमारतींचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या ऐतिहासिक स्थळापैकी या भिंती आहेत.
मोरोक्कोमध्ये गेल्या दशकातील हा सर्वात प्राणघातक भूकंप ठरला आहे. यामध्ये 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सैन्य आणि आपत्कालीन सेवा दुर्गम पर्वतीय खेड्यांमध्ये पोहोचण्यासाठी धावपळ करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रबत, कॅसाब्लांका आणि एसाओइरा या किनारपट्टीच्या शहरांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यरात्री येथील रहिवाशांना आणि पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.
मोरोक्को भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी फ्रांसने मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. "भुकंपग्रस्त लोकांच्या बचावासाठी आणि मदतीसाठी आम्ही तयार आहोत", असे फ्रांसच्या परराष्ट्र मंत्रालायाने म्हटले आहे. पॅरिसचे राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी पेक्रेसे 500,000 युरो ($535,000) मदत जाहिर केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.