मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला आहे. कोणत्याही पालापाचोळ्याला उमेदवारी देणार असाल तर आमचा पाठिंबा गृहीत धरू नका, असा इशाराच मनसे नेत्यांनी दिला आहे.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुती अजूनही उमेदवाराच्या शोधात आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत दाखल झालेले वायकर आणि काँग्रेसमधून निलंबित झालेल्या निरुपम यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला मनसेकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. या भागातील मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत विरोध दर्शविला आहे. 'मनसे'ला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्यांवर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
लक्षात ठेवा, राज ठाकरे यांनी देशाला सक्षम नेतृत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी शिंदे सेनेला दिला आहे.