यूपीतील आणखी एक एमडी ड्रग्ज फॅक्टरी ठाणे पोलिसांकडून उद्ध्वस्त

 एमडी ड्रग्ज
एमडी ड्रग्ज
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : यूपीतील वाराणसी जिल्ह्यात एमडी ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केली. सातजणांना यूपीतल्या आजमगड येथून अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 14 झाली आहे. या सर्व आरोपींच्या ताब्यातून एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य असे एकूण 48 कोटी 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 जानेवारी 2024 रोजी एका ड्रग्ज पेडलर्सला ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 15 ग्रॅम एमडी ड्रग्जसह अटक केली होती. अटकेतील आरोपीने हे ड्रग्ज त्याच्या इतर साथीदाराकडून विकत घेतले होते, असे चौकशीतून समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने 24 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आफताफ अजीज मलाडा (22, नालासोपारा, वसई, जिल्हा पालघर), जयनाथ चंद्रबली यादव ऊर्फ कांचा (27, नालासोपारा), शेरबहाद्दूर राधेश्याम सिंग ऊर्फ अंकित (23, नालासोपारा) आणि हुसेन सलीम सैय्यद (48, नालासोपारा) या चौघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 14 लाख रुपये किमतीचे 481 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

अटकेतील चौघा आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणले, याचा तपास केला असता त्यांनी हे ड्रग्ज यूपीतून आणल्याचे समोर आले. वाराणसी जिल्ह्यातील भगवतीपूर या गावात काहीजण घरातच ड्रग्ज फॅक्टरी उभारून एमडी ड्रग्ज निर्मिती करीत असल्याचे देखील पोलिस तपासातून उघड झाले. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले होते. या पथकाने यूपीतल्या छोट्याशा गावात तब्बल दीड महिना वेशांतर करून ड्रग्ज फॅक्टरीचा शोध घेतला. फॅक्टरीची माहिती हाती लागताच ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने 16 मार्च 2024 रोजी यूपी स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला.

यावेळी अतुल अशोककुमार सिंह (36, पूआरी खुर्द, जिल्हा वाराणसी, उत्तर प्रदेश) आणि संतोष हडबडी गुप्ता (38, तिवारीपूर खुर्द, जिल्हा वाराणसी, उत्तर प्रदेश) या दोघांना एमडी ड्रग्ज बनवत असतांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलेे. तर घरातच थाटलेल्या ड्रग्ज फॅक्टरीतून एमडी बनवण्यासाठी लागणारे केमिकल, साहित्य, एक कार आणि 2 कोटी 64 लाखाचे तयार एमडी असे एकूण 27 कोटी 87 लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता.

दरम्यान, या गुन्ह्यातील इतर फरार आरोपीचा शोध घेत असताना ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास फरार आरोपी विजय पाल व त्याच्या इतर साथीदारांनी यूपीतल्या आजमगड येथे पुन्हा एमडी ड्रग्ज बनवण्याची फॅक्टरी उभारली आहे. या माहितीच्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेचे पथक आजमगड येथे पोहोचले. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आजमगड येथील एमडी ड्रग्ज बनवण्याच्या फॅक्टरीवर 24 एप्रिल 2024 रोजी छापा टाकला.

यावेळी संदीप इंद्रजित तिवारी (वाराणसी), ललित ऊर्फ सोनू राकेशचंद पाठक (वाराणसी), अनिल शिवआसरे जैस्वाल (नालासोपारा, जिल्हा पालघर), निलेश श्रीधर पांडे (वापी, गुजरात), विजय रामप्रसाद पाल (वाराणसी), बिंदू ऊर्फ जीलाजित जोखई पटेल (वाराणसी), दिलीप जैस्वाल (नालासोपारा) या सात जणांना अटक करण्यात आली. तर ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने आजमगड येथील फॅक्टरीतून तब्बल 20 किलो एमडी बनवण्याचा कच्चा माल व इतर साहित्य असा एकूण 20 कोटी 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवाईत आतापर्यंत पोलिसांनी एकूण 48 कोटी 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news