स्वतंत्र आरक्षण दिले, आता ओबीसीतून वाटा कशाला हवा?; छगन भुजबळ

स्वतंत्र आरक्षण दिले, आता ओबीसीतून वाटा कशाला हवा?; छगन भुजबळ
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मराठासारख्या एका जातीलाच 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करीत असतील तर त्याला आमचा विरोध राहील, असे ओबीसी नेते व अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी ठणकावले. मराठा म्हणून आरक्षण दिले असताना आता कुणबी आरक्षण कशासाठी पाहिजे, मग ते 10 टक्के आरक्षण कुणासाठी, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या 

मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासप्रवर्गांतून स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी पत्रपरिषद घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. ओबीसीत आधीच 54 टक्के समाज आहे, 374 जाती आहेत. त्यामुळे मराठासारखा बलदंड समाज आला तर कुणालाच काही मिळणार नाही.

सरकार एका जातीलाच वेगळे आरक्षण देत आहे तर त्यांनी ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा, असा सवालही त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यापूर्वी लाखांचे मोर्चे निघाले. शांततेत व कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. परंतु, यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. बीडमध्ये घरे, गाड्या, ऑफीस पेटविले. जखमींना दवाखान्यात नेताना दगडफेक झाली. त्यात 80 पोलीस जखमी झाले, असे भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसीतून नको, अशी आमची मागणी होती, असे भुजबळ म्हणाले.

कुणबीकरणाला विरोध

राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटण्यालाही भुजबळ यांनी विरोध दर्शवला. राज्यात कुणबीकरणाचे प्रयत्न सुरू असून, त्यात बोगस प्रमाणपत्र वाटली जात असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. यासंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी खाडाखोड केलेली प्रमाणपत्रे दाखवली. ते म्हणाले, मागासवर्गीय असलेल्यांनाही कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले आहे. वंजारी व्यक्तीलाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. हाताने खोडून दाखल्यावर मराठा कुणबी लिहिले जात आहे. काहींना मराठी कुणबी असेही प्रमाणपत्र मिळाले. एका दाखल्यावर मराठा तर दुसर्‍या प्रमाणपत्रावर कुणबी उल्लेख आहे. या कुणबीकरणाला आमचा विरोध आहे, ते थांबवले पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news