मुंबई भाजपची अंतर्गत धुसफूस मनोज कोटक यांना भोवली !

मनोज कोटक
मनोज कोटक
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भाजपमधील अंतर्गत धुसफुसीमुळे मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार मनोज कोटक यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून, मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोटक यांच्यावर मुंबईतील एक वरिष्ठ नेता नाराज असल्यामुळे त्यांचा पत्ता कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार मनोज कोटक यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. भाजपा नेते अमित शहा यांचे खंदे समर्थक समजल्या जाणार्‍या कोटक यांच्या उमेदवारीचा शहा यांनी आग्रह धरला होता. एवढेच नाही तर कामाला लागा, असे आदेशही कोटक यांना मिळाले होते. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी घाटकोपर येथे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले होते. मात्र अचानक कोटक यांना उमेदवारी नाकारून, आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देऊन मतदारसंघातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का देण्यात आला आहे.

नगरसेवक असताना थेट खासदारकीची उमेदवारी दिल्यामुळे मतदार संघातील वरिष्ठ नेते नाराज होते. त्यात कोटक यांनी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याचीही नाराजी ओढवून घेतली होती. कोटक यांच्याबद्दल असलेल्या अंतर्गत मतभेदाबद्दल भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. कोटक यांना उमेदवारी द्यायची की नाही, यावरून गेले दोन दिवस दिल्लीमध्ये खलबते सुरू होती. अखेर कोटक यांना उमेदवारी न देण्यावर एकमत झाले.

याचवेळी कोटक यांच्यावर नाराज असलेल्या नेत्याच्या गेल्या काही दिवसापासून जवळ असलेल्या आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. कोटेचा यांच्यावर काही महिन्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. मात्र महापालिका मुख्यालयात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा बसू लागल्यापासून कोटेचा उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहेत.

कोटेचा भाजपामध्ये फारसे सक्रिय नव्हते. मात्र दिल्ली कनेक्शन असल्यामुळे 2014 मध्ये वडाळा विधानसभा मतदारसंघातून कोटेचा यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. यावेळी त्यांचा अवघ्या 800 मतांनी पराभव झाला होता.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुलुंड विधानसभेमधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांना उमेदवारी नाकारून, कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. कोटेचा यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असतानाही भाजपाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

संजय दिना पाटील असू शकतात मविआचे उमेदवार !

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये पाटील या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यावेळी त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा 3 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये ही पाटील तिसर्‍यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभेला उभे राहिले होते. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युती असताना 2 लाख 88 हजार मते घेतली होती.

यावेळी मनोज कोटक यांना 5 लाख 14 हजार मते मिळाली होती. मात्र आता भाजप-शिवसेना युती नाही. तर दुसरीकडे कोटेचा नवखे उमेदवार असल्यामुळे भाजपचे मताधिक्य घटण्याची शक्यता आहे. त्यात संजय दिना पाटील सध्या ठाकरे गटात असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी महायुतीही असल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मतदारसंघ फायदेशीर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोटक यांना विधानसभेची ऑफर !

मनोज कोटक यांना मुलुंड विधानसभेतून विधानसभेची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर कोटक यांना राज्यात मंत्री पदही देण्याचे खुद्द भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. मात्र कोटक ही ऑफर स्वीकारणार की नाही, याकडे आता भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news