सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त

सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त
Published on
Updated on

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर हीट म्हणावी तशी अनुभवायला मिळाली नाही. तसेच नोव्हेंबर सुरू झाला तरीही थंडीची चाहूल लागली नव्हती. मात्र डिसेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागताच आंबा व काजू कलमे मोहरण्यास सुरवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी आंब्याला मोहर लागला असला तरी सतत होणा-या वातावरणातील बदलामुळे हा मोहर टिकवण्याची कसरत सध्या आंबा बागायतदार यांना करावी लागत आहे. त्यामुळेच आलेला मोहर राखून त्याचे फळात रूपांतर होईपर्यंत आंबा उत्पादन शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत. त्यामुळे असेच थंडीचे वातावरण राहिल्यास आंबा व काजू उत्पादन वाढीस मदत मिळणार आहे.

गेली काही वर्ष वातावरणातील बदलामुळे याचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार यानाही बसला आहे. यात सध्याचे वातावरणातील बदल पाहता अधूनमधून पाऊस, तर कधी सकाळी पाऊस दुपारी ऊन तर संध्याकाळी थंडी असे होते. मात्र धुके व थंडीची चाहूल म्हणावी तशी सुरवात झालेली नाही यामुळेच अनेक आंबा कलमे मोहरण्यास उशिर लागला आहे. मात्र वातावरणातील या बदलामुळे हा आलेला मोहोर टिकवण्यासाठी सध्या आंबा बागेत फवारणी मोठया प्रमाणात सुरू आहे.

आंब्याला नवी पालवी फुटल्यावर पावसाळ्यात ही प्रक्र‌िया सुरूच राहते. पाऊस थांबला की झाडाची पालवी पक्व होऊन मोहोर येण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो. आंब्याच्या फुटव्यात काडी तयार होऊन ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस अनेकदा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहोर येतो. दरवर्षी कडाक्याच्या थंडीनंतर आंबा झाडांना मोहोर येतो. मात्र यंदा सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रीया रखडली होती. पावसामुळे तसेच थंडी उशिरा पडल्याने मोहोर येण्याची प्रक्र‌िया लांबली होती.परिणामी बाजारात फळांच्या राजाचे आगमनही उशिरा होण्याची शक्यता असल्याने. हवामानाचा फटका बसल्याने आंब्याचे उत्पादनही घटू शकते.

सध्या काहीवेळा ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा वाढला आहे. रात्री थंडी तर दिवसा उन्हाचा तडाखा जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे मोहोर टिकून राहणार का? हा प्रश्न आहे.त्यात किडीचाही प्रादुर्भाव होतो. यामुळेच शेतकऱ्यांना नेहमीच हवामानाचा फटका बसतो. आता आलेला मोहोर टिकून राहाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत असून याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news