मुंबई; पुढारी ऑनालईन : समीर वानखेडे आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Malik Vs Wankhede) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन वानखेडेंवर आणखी आरोप केलेले आहेत. मलिक म्हणाले की, "समीर वानखेडे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंधित आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांची परवानगी न घेता क्रूझ पार्टीचे आयोजन करण्यात आले. वानखेडेंनी बनावट जात प्रमाणात दाखवून नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी वानखेडेंनी हिरावली. वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकी दिली जात आहे", असंही त्यांनी सांगितले.
"पैशांच्या आरोपांची चौकशी व्हावी. क्रूझ पार्टीचे सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात यावेत. धर्मावरून राजकारण करण्याचा मूळीच हेतू नाही. व्हिडिओमधील 'दाढीवाला' कोण आहे, याचा शोध घेण्यात यावा. तो दाढीवाला समीर वानखेडेंचा मित्र आहे. त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. १३०० लोकांना स्कॅन करण्यात आलं नाही. मात्र, काही १२-१३ लोकांना अडकविण्यात आलं. सॅम डिझूजा आणि दाढीवाला कोण आहे, याचं उत्तर वानखेडे यांनी द्यावं. तो दाढीवाला तिहार तुरुंगात होता. ड्रग्ज प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे", असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट केले. त्यात समीर वानखेडेंच्या (Malik Vs Wankhede) पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला. ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, "समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते", असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत नवाब मलिकांनी त्यांना अडचणीत आणलं आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्न उपस्थित केले. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे", असेही नवाब मलिक यांनी म्हंटलं होतं.
समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे, असा दावा या पत्रातून करण्यात आला होता.