ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त जय जित सिंग व उद्धव ठाकरे यांची भेट न झाल्याने बुधवारी निघणाऱ्या मोर्चाकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. महाविकास आघाडीच्या या मोर्चावेळी पोलीस आयुक्त निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित असतील का याबाबत देखील उत्सुकता लागून होती. दरम्यान, मोर्चात प्रमुख नेत्यांची भाषणे संपल्यानंतर आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे, काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदींसह काही मोजक्याच नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस आयुक्त जय जित सिंग यांना निवेदन दिले. यावेळी रोशनी शिंदे प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी उपस्थित नेत्यांनी केली. तर मी याप्रकरणी लक्ष देतो, असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी दिले.