महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांची गादी विभागातून आगेकूच

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांची गादी विभागातून आगेकूच
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून तर शुभम शिदनाळे याने माती विभागातून आगेकूच करताना ६५ व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आगेकूच केली. वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला पराभूत करताना धक्कादायक निकाल नोंदविला.

गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या पहिल्या लढतीत २०१९ महाराष्ट्र केसरी विजेता व नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने अहमदनगरच्या सुदर्शन कोतकरला ३-० असे पराभूत केले. पहिल्या दीड मिनिटांत दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. त्यानंतर मात्र, सुदर्शन कोतकरला कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. मात्र तो, गुणांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला १ गुण देण्यात आला. दुसर्‍या फेरीत देखील सुदर्शन कोतकरला ताकीद देण्यात आली. यावेळी देखील तो गुण मिळविण्यासाठी अपयशी ठरला. यावेळी हर्षवर्धनने हफ्ते डावावर एका गुणाची कमाई केली. त्यानंतर हर्षवर्धनने सुदर्शनला वर्तुळाच्या बाहेर ढकलत एक गुण कमावताना लढत जिंकली.

गादी विभाग कल्याणचा नरेश म्हात्रेने वाशीमच्या वैभव मानेला ४-२ असे पराभूत केले. पहिल्या फेरीतच नरेशने ३ गुणांची झटपट कमाई केली. दुसर्‍या फेरीत वैभवने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या १५ सेकंदातच वैभवाने नरेशला वर्तुळाच्या बाहेर ढकलताना १ गुणांची कमाई केली. मात्र त्यानंतर १५ सेकंदाने नरेशने वैभवाला मॅटच्या बाजूला ढकलताना पुन्हा ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोरदार प्रतिआक्रमण करत वैभवने एक गन मिळवला, परंतु लढत जिंकण्यास वैभव अपयशी ठरला.

गादी नागपूरच्या राकेश देशमुखने यवतमाळच्या राजेश एकणारला १०-० असे पराभूत करताना आगेकूच केली. पहिल्या राकेश देशमुखने वर्तुळाबाहेर ढकलत २ गुणांची कमाई केली. पुन्हा लढत सुरु झाल्यानंतर राकेश देशमुखने भारंदाज डाव टाकताना चार गुणांची कमाई केली. त्यानंतर पुन्हा भारंदाजच डाव टाकत परत ४ गुणांची कमाई करताना लढत जिंकली.

माती विभागातून चुरशीच्या लढतीत वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माऊली जमदाडेला ९-४ असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली. सुरुवातीलाच सिकंदरने माउलीवर ताबा घेताना २ गुण मिळविले. माऊली जमदाडेने पहिल्याच प्रयत्नात दुहेरी पट काढताना थेट ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर सिकंदर शेखने शक्ती आणि युक्तीची सांगड घालत माउलीचा ताबा घेत २ गुणांची कमाई केली. त्यानंतर माऊली जमदाडेने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला परंतू हा डाव उलटून टाकताना सिकंदरने ४ गुणाची कमाई केली. त्यानंतर दोघांनी देखील एकमेकांवर डाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, यात माऊली जमदाडे याला बाहेर वर्तुळाच्या बाहेर ढकलत सिकंदरने गुणाची कमाई करताना विजय मिळविला.

माती विभागात कोल्हापूरच्या शुभम शिदनाळे याने ठाणेच्या अप्पा सरगरला चीतपट केले. लढतीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत शुभमने ३ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर शुभमने आप्पा सरगरला चितपट करताना विजय साकारला. ५७ किलो वजनी गटाच्या माती विभागात सोलापूरच्या सौरभ इंगवेने सुवर्णपदक, सांगलीच्या रोहित तामखेडेने रौप्य तर पुणे जिल्हा संघाच्या ओमकार निगडेने कांस्य पदक पटकावले. गादी विभागात बीडच्या आतिश तोडकरने सुवर्णपदक, कोल्हापूरच्या सुरज अस्वलेने रौप्यपदक तर कोल्हापूरच्या अतुल चेचर व पुण्याच्या विजय मोदर याना कांस्य पदक विभागून देण्यात आले.

८६ किलो गटात गादी प्रकारात पुणे जिल्ह्याच्या प्रतिक जगतापला सुवर्ण, तर उस्मानाबादच्या मुंतजीर सरनौबतला रौप्य तर सोलापूर शहरच्या एकनाथ बदरे व सतारच्या विजय डोईफोडे याना कांस्य पदक विभागून देण्यात आले. ८६ किलो माती विभागात भांडारा जिल्ह्याच्या अर्जुन काळेला सुवर्णपदक, वाशीमच्या सचिन पाटीलला रौप्य तर सोलापूर जिल्ह्याच्या राहुल काळेला रौप्यपदक देण्यात आले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news