Maharashtra Kesari : धाराशिव येथे गुरूवारपासून पहिल्यांदाच रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा फड

Maharashtra Kesari : धाराशिव येथे गुरूवारपासून पहिल्यांदाच  रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा फड
Published on
Updated on

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कुस्ती स्पर्धा दि.१६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात होणार आहे. जिल्ह्यात कुस्तीचा फड पहिल्यांदाच रंगणार असून यासाठी राज्यभरातून ९५० मल्‍ल व ५०० पंच दाखल झाले आहेत. माती आणि गादीवरील कुस्ती स्पर्धेत नामवंत मल्‍लांचे शड्डू संकुलात घुमणार आहेत. (Maharashtra Kesari)

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी 'पुढारी'शी बोलताना ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, बसवेश्‍वर पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत साखरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके आदी उपस्थित होते.

सुधीर पाटील म्हणाले, की प्रामुख्याने कुस्तीपंढरी म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा परिसर ओळखला जातो. त्यातही कोल्हापूर तर या क्रीडा प्रकाराची राजधानी आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्हा एक असताना १९६९ मध्ये अशी स्पर्धा उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूरमध्ये झाली होती. त्यानंतर हे दोन्ही जिल्हे वेगळे झाले. उस्मानाबाद शहरात अशी स्पर्धा इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. कुस्तीगीर परिषदेने दाखविलेला विश्‍वास आम्ही सार्थ करणार आहोत. सर्वपक्षीय तसेच अनेक क्रीडा प्रेमी, क्रीडा संस्थांच्या सहयोगाने नियोजन तडीस नेले जात आहे. शासकीय अधिकारीही योगदान देत आहेत. गुरूवारी (दि.१६) सर्व मल्‍ल दाखल होतील. तर शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होणार आहे. माती व गादी असे दोन्हींचे प्रत्येकी १० गट आहेत. जवळपास ५५ ते ६० स्पर्धा होणार आहेत. पालकमंत्री तानाजी सावंत, क्रीडामंत्री संजय बनसोडे, जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. छत्रपती उदयनराजे, माजी खा. संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, तुळजाभवानी देवीचे महंत यांसह विविध पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Kesari  : ६५ हजार प्रेक्षकांची गॅलरी

धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात ही स्पर्धा होत असून ६५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी आकारास आली आहे. महाराष्ट्र केसरी किताबासाठी सोमवारी (दि.२०) सायंकाळी चार वाजता अंतिम लढत होणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news