Maha Vikas Aghadi Sabha : ”काही न करता कोंबडे झुंजवत बसायचं” : वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

Maha Vikas Aghadi Sabha : ”काही न करता कोंबडे झुंजवत बसायचं” : वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकासआघाडीची सभा आज (दि. २) छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-ठाकरे गट या तीनही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केल्या. करायचं काही नाही फक्त कोंबडे झुंजवत बसायचं आणि निवडणुका आल्यावर जातीय तेढ निर्माण करायची. अशी टीका यावेळी ठाकरेंनी भाजपवर केली.

२५ वर्षं आपण वेगळ्या भ्रमात होतो. भाजपाबरोबर आपली युती होती. दोनदा सरकार आले. पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झाले होतं का? म्हणूनच मला अभिमान वाटतो आणि मविआच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद देतो, आम्ही सोबत असताना जे भाजपाला जमलं नाही, ते मविआ सरकारनं करून दाखवलं आहे. याच एका गोष्टीवरून भाजपची वृत्ती कशी आहे हे तुमच्या लक्षात आले असेल असे ठाकरे म्हणाले.

जातीय तेढ निर्माण झाली की समजा निवडणुका जवळ आल्या आहेत. सावरकर गौरव यात्रेचा उल्लेख झाला. जरूर काढा. हल्ली महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश सुरू झाला आहे. मुंबईत काढला होता. मुंबईत कुठून काढला मला माहिती नाही, पण शिवसेना भवनापर्यंत आणला. मी म्हटलं याचा अर्थ एकच आहे. जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता, देशाचा पंतप्रधान झाल्यानंतरही देशातल्या हिंदूंना आक्रोश करायला लागतोय, त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे? मविआचं सरकार होतं. हिंदू, मुस्लीम अशा कोणत्याही धर्मीयांना आक्रोश कऱण्याची वेळ आम्ही येऊच दिली नव्हती

मालेगावातल्या सभेत असंख्य मुस्लीम बांधव आले होते. इथेही आले असतील. माझ्यावर आरोप करतायत की मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही मला एक उदाहरण दाखवा जिथे मी हिंदुत्व सोडले आहे. मी आत्ता इथून घरी जाऊन बसेन, तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही.

ज्या ज्या वेळी मी या मैदानात आलो, तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलाच नाहीये. उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच दिसतोय.
याच शहरात १९८८ साली महापालिका शहरवासीयांनी शिवसेनेच्या ताब्यात दिली. याच व्यासपीठावरून शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं. तेव्हाच शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं की आजपासून या शहराचं नाव मी बदलून संभाजीनगर करतोय.

आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आता राज्यभरात एकत्रित सभा घेणार आहेत. आज (दि. २ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर शहरातून या सभेला सुरुवात झाली. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात ही सभा पार पडली. दरम्यान या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग आणि भगवे झेंडे लावण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news