Madhumita Shukla Murder Case: माजी मंत्री अमरमणी, पत्नीच्या सुटकेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Madhumita Shukla Murder Case: माजी मंत्री अमरमणी, पत्नीच्या सुटकेला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क: लखीमपूर खेरी जिल्ह्यातील कवयित्री मधुमिता शुक्ला हत्याकांडप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी यांना २० वर्षांनंतर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मधुमिता शुक्ला यांची बहीण निधी शुक्ला यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने सध्या अमरमणी आणि त्यांच्या पत्नीच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सध्या अमरमणी आणि त्यांची पत्नी दोघेही बाबा राघव दास (BRD) मेडिकल कॉलेज, गोरखपूरमध्ये आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 आठवड्यांनी होणार आहे. Madhumita Shukla Murder Case)

न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने कवयित्रीची बहीण निधी शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर राज्य सरकार, त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीला नोटीस बजावली आणि आठ आठवड्यांत उत्तर मागितले आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील माजी मंत्री अमरमणी त्रिपाठी यांचे राजकारण एका महिलेच्या हत्येतील सहभागामुळे संपुष्टात आले. 9 मे 2003 रोजी लखीमपूर खेरी येथील 24 वर्षीय कवयित्री मधुमिता शुक्ला यांची हत्या करण्यात आली होती. त्या दिवशी लखनौच्या पेपर मिल कॉलनीतील मधुमिताच्या घरात घुसून दोन बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून मधुमिताची हत्या केली होती. या हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण उत्तर प्रदेशात उमटलेले होते. तत्कालिन मुलायमसिंग यादव सरकारमधील मंत्री अमरमणी त्रिपाठी यांच्यावर संशयाची सुई होती.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारही या घटनेवर लक्ष ठेवून होते. या घटनेच्या दोन वर्षांपूर्वी टाउनशिपमधील एका व्यावसायिकाच्या १५ वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अमरमणीचे नाव पुढे आले होते. राहुल नावाच्या मुलाचे अपहरण करून अमरमणी यांच्या बंगल्यात ठेवले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांनी अमरमणी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते. यानंतर भाजपनेही त्यांच्यापासून फारकत घेतली होती. यानंतर अमरमणी यांनी 2002 मध्ये बसपा आणि 2003 मध्ये सपामध्ये प्रवेश केला होता.

Madhumita Shukla Murder Case: काय आहे मधुमिता शुक्ला प्रकरण ?

मधुमिता शुक्ला या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील रहिवासी होत्या. ती कविसंमेलनात जायच्या. वीर रासच्या कविता वाचायच्या. दरम्यान, मधुमिता मंत्री अमरमणीच्या संपर्कात आल्या. त्यानंतर त्यांच्य़ातील जवळीक वाढू लागली. मधुमिता यांचीही प्रसिद्ध वाढू लागली. दरम्यान, दोघांच्या या नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून मधुमिता गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जाऊ लागला. अमरमणी हे नाते स्वीकारण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याच वेळी, मधुमिता कोणत्याही परिस्थितीत गर्भपात करण्यास तयार नव्हती.

दरम्यान, 9 मे 2003 रोजी सातव्या महिन्यातील गरोदर मधुमिता शुक्ला हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी संतोष राय, अमरमणी यांचा भाचा रोहितमणी त्रिपाठी आणि पवन पांडे यांची नावे समोर आली. याशिवाय अमरमणी त्रिपाठी आणि त्यांची पत्नी मधुमणी त्रिपाठी यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी लखनौच्या महानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधिकारी अजय कुमार चतुर्वेदी यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. तपासादरम्यान मधुमिताची डायरी आणि इतर माहिती गोळा केली. या घटनेचा एकमेव साक्षीदार असलेल्या घरातील नोकराला संरक्षण देण्यात आले. यानंतर अमरमणी यांच्या घराची चौकशी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासावर मधुमिताची बहीण निधी शुक्ला समाधानी नव्हती. अशा परिस्थितीत हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आले. सीबीआयने आपल्या पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली. जून 2003 मध्ये या प्रकरणाला कलाटणी मिळाली. या प्रकरणाचा तपास करणारे 1967 बॅचचे आयपीएस अधिकारी महेंद्र लालका यांना सरकारने निलंबित केले.

Madhumita Shukla Murder Case: प्रकरण सीबीआयकडे वर्ग

मधुमिता शुक्ला खून प्रकरण हा मोठा राजकीय मुद्दा बनला होता. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने या घटनेच्या तपासाला गती दिली. हत्याकांडातील सहभागाबद्दल सप्टेंबर 2003 मध्ये अमरमणी यांना अटक करण्यात आली. मधुमिताच्या हत्येनंतर अमरमणी त्रिपाठी यांची पत्नी मधुमणी हिला गोरखपूरमध्ये फोन करण्यात आल्याचे सीबीआय तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मधुमणीलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले. यानंतर अमरमणी यांनी जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अमरमणी यांनी डीएनए चाचणी करण्यास नकार दिला होता. अमरमणी आणि मधुमणी यांना गोरखपूर तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र, 2007 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अमरमणी तुरुंगातूनच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नौतनवन येथून त्यांनी जनता दलाचे कौशल किशोर यांचा सुमारे 20 हजार मतांनी पराभव केला.

मधुमिताच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

या घटनेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मधुमिताचे कुटुंबीय अमरमणीवर कठोर कारवाईची मागणी करत होते. मात्र, सुरुवातीच्या काळात अमरमणी यांनीही आपला राजकीय प्रभाव वापरला. या घटनेच्या वेळी मायावती सरकार उत्तर प्रदेशमध्ये सत्तेवर होते. अमरमणी मंत्री होते. तर दुसरीकडे महानगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून सीबीआयने तपास हाती घेतला. साक्षीदारांची चौकशी सुरू केली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news