Lok Sabha Election : नामवंत लेखक झाले खासदार

खासदार
खासदार

लोकसभेचा आखाडा हा खरा तर मुरब्बी राजकारण्यांचा असतो. तथापि, देशातील अनेक नामवंत साहित्यिकांनी लोकसभा निवडणूक लढवून ते विजयी झालेले आहेत. साहित्यातील भरीव योगदानाबरोबरच राजकारणातही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावलेली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे ज्येष्ठ आणि बुद्धिमान राजकीय नेते होते, तसेच ते हिंदीमधले नामवंत कवी आणि लेखक होते. ते पहिल्यांदा 1957 मध्ये बलरामपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. ( Lok Sabha Election )

वाजपेयी हे नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. त्यांची 22 पुस्तके प्रकाशित आहेत. आनंद नारायण मुल्ला हे उर्दू भाषेतले नामवंत साहित्यिक. ते 1967 मध्ये लखनौ मतदार संघातून खासदार झाले. आनंद नारायण हे मूळ काश्मीरचे. तेथील मुल्ला वंशज. काश्मिरी ब्राह्मण. पंडित कालिदास मुल्ला लखनौला स्थलांतरित झाले व तिथेच ते स्थायिक झाले. त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

अब्दुसमद समदानी हे केरळमधील कोट्टक्कल येथून 2021 च्या पोटनिवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. ते मल्याळी हिंदी, उर्दू, संस्कृत, अरबी, पर्शियन भाषेतील विद्वान आहेत. ते मल्याळीत साहित्यनिर्मिती करतात. डॉ. राजकुमार रंजन सिंग हे 2019 मध्ये मणिपूरमधून लोकसभेवर निवडून आले. त्यांनी विज्ञानविषयक साहित्यनिर्मिती केलेली आहे. विद्याधर गोखले हे प्रख्यात नाटककार होते. 1989 मध्ये ते उत्तर- मध्य मुंबईतून लोकसभेवर निवडून आले. हे मराठी संपादक व संगीत नाटककार होते. विद्याधर गोखले यांचे लेखन रंजकतेकडे अधिक झुकणारे होते. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत लेखन सालंकृत करण्यावर त्यांचा अधिक भर असे.

वीरेंद्र कुमार हे मल्याळी लेखक असून ते 1996 आणि 2004 मध्ये खासदार झाले. त्यांची सुमारे 15 पुस्तके प्रकाशित आहेत. डी रविकुमार हे तामिळी लेखक असून तामिळनाडूतील विल्लुपूरम येथून 2019 मधून लोकसभेवर निवडून आले. त्यांची कविता, कथा, कादंबरी, अनुवाद अशा प्रकारातील 38 पुस्तके प्रकाशित आहेत. शशी थरूर यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. पण ते वाढले भारतात. त्यांची मातृभाषा मल्याळम आहे तथापि ते इंग्रजी भाषेत लिहितात. त्यांची आतापर्यंत 50 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ( Lok Sabha Election )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news