भंडारा; पुढारी वृत्तसेवा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावेदारी केली असतानाच आता या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही दावा ठोकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटासोबत आल्याने ते ही निवडणूक लढणार काय? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील इच्छुकांची मात्र धडधड वाढली आहे.
राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार काँग्रेसमधील इच्छुकांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवातही केली आहे. एकाही पक्षाने आपली उमेदवारी जाहिर केली नसल्याने आधीच इच्छुकांमध्ये संभ्रम असताना राष्ट्रवादीचे माजी खासदार मधुकर कुकडे हे शरद पवार गटात आले. आज बुधवारी शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक भंडारा येथील देवेंद्र लॉनमध्ये घेण्यात आली. या बैठकीत मधुकर कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुत्रानुसार, ही निवडणूक नाना पटोले लढतील तरच कॉंग्रेसने या जागेवर दावा सांगावा, अन्यथा आघाडीच्या धोरणानुसार ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (शरद पवार) ही जागा सोपवावी, असा ठराव स्थानिक शरद पवार गटाच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेसकडून नाना पटोले ही निवडणूक लढण्याच्या तयारीत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (शरद पवार) जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार मधुकर कुकडे यांचे शरद पवार गटात जाणे, महत्वाचे मानले जात आहे.
मधुकर कुकडे हे तुमसर विधानसभा क्षेत्रातून सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय २०१८ मध्ये झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.