औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : फोन टॅपिंगचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रमुख आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सूचना दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अॅपलचा आयफोन उत्तम मानला जातो, मात्र तो इतर कंपन्यांच्या तुलनेत महागडा आहे. तरीदेखील असा फोन वापरण्याच्या सूचना अंबादास दानवे यांनी दिल्या आहेत.
नजीकच्या काळात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकमेकांना शह देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांचे संभाषण 'लीक' झाले तर राजकीय नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या असाव्यात, असा कयास बांधला जात आहे.
शिवसेनेचे राज्यात सर्वाधिक पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतरच आणखी काही आमदार कुंपणावर आहेत काय, फोन टॅप होण्याची भीती नेमकी याचवेळी का आणि ते कुणाकडून टॅप होऊ शकतात, हे महागडे फोन पक्ष पदाधिकाऱ्यांना पुरवणार काय, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
आपण आयफोन वापरण्याच्या सूचना दिलेल्याच नाहीत, असे अंबादास दानवे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले. आयफोन महागडे असतात, पदाधिकारी ते कसे वापरू शकतील, असेही ते म्हणाले.