रूग्‍णालयाच्या बिलासाठी बापाने नवजात बाळाला विकले; खुलासा झाला तेंव्हा…

File Photo
File Photo

फिरोजाबाद (UP) : पुढारी ऑनलाईन महिलेने एका जवळच्याच रूग्‍णालयात मुलाला जन्म दिला. यानंतर रूग्‍णालयाने संबंधीत महिलेला १८ हजार रूपयांचे बिल समोर ठेवले. महिलेच्या पतीने रूग्‍णालयाचे बिल भरण्यास असमर्थता दर्शविली. तेंव्हा त्‍यावर रूग्‍णालयाच्या संचालक आणि दलालाने बाळाला विकून बिलातून सुटका करून घेण्यास सांगितले. तसेच अडीच लाख रूपयेही मिळवून देण्याची स्‍कीम गरिब दाम्‍पत्‍याला सांगितली.

या विषयी अधिक माहिती अशी की, उत्‍तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एका नवजात बाळाला विकल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयाच्या चालकाने दलालासोबत मिळून नवजात अर्भक ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या सोनाराला विकले. गरिबीने पिचलेले आई-वडिल देखील या दलालाच्या तावडीत सापडले. बाळ विकण्याच्या प्रकरणात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या विषयीची संपूर्ण कहाणी…

वास्तविक, राणी नगर, कोटला रोड, पोलिस स्टेशन उत्तरजवळ राहणाऱ्या दामिनीने १८ एप्रिल रोजी एका हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. दामिनीचा पती धर्मेंद्र हा व्यवसायाने मजूर असून, हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठीचे झालेले 18,000 रुपयांचे बिल भरण्यासाठी त्‍याच्याकडे पैसे नव्हते. याचाच फायदा घेत रुग्णालयातील डॉक्टर आणि दलालाने धर्मेंद्रला पैशांचे आमिष दाखवून त्याच्यावर इतका दबाव टाकला की त्याला आपले मूल विकण्यास भाग पाडले. त्या बदल्यात त्याला हॉस्पिटलचे बिल भरावे लागणार नाही, असे आमिषही देण्यात आले. याशिवाय अडीच लाख रुपये रोख देण्यात येणार असल्‍याचेही सांगितले.

मजूर धर्मेंद्र यांना आधीच एक मुलगी आणि एक मुलगा आहे. धर्मेंद्र यांनी दलाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ग्वाल्हेरचे रहिवासी असलेल्या सज्जन गर्ग आणि त्यांची पत्नी रुची गर्ग या निपुत्रिक जोडप्याशी आपल्या मुलाचा सौदा केला. ग्वाल्हेरच्या निपुत्रिक दाम्पत्याने फिरोजाबादच्या दलाल आणि डॉक्टरला पैसे देऊन नवजात बाळाला सोबत नेले.

मात्र धर्मेंद्र यांना पूर्ण रक्कम न मिळाल्याने हे प्रकरण बिघडले. मुलाला आपल्‍यापासून दूर नेल्यानंतर आई दामिनीला मुलाची आठवण येउ लागली. त्‍यामुळे तीने आपल्‍या मुलाला परत आणण्यासाठी पतीकडे हट्ट धरला. अखेर दामिनीच्या शेजाऱ्यांनी ही बाब रामगड पोलीस ठाण्यात दिली. मुलाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक तातडीने सक्रिय झाले आणि गुरुवारी ग्वाल्हेरला जाऊन स्वर्णकार दाम्पत्याकडून मूल जप्त करून फिरोजाबादला आणले.

सध्या बाळाची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी एका खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि ग्वाल्हेरच्या दलालासह येथे राहणाऱ्या एका निपुत्रिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सखोल तपास करण्यात येणार असून, यापूर्वीही या रुग्णालयात असा प्रकार घडला आहे का, याचाही शोध घेण्यात येणार आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल.

त्याचवेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आशिष कुमार यांनी सांगितले की, ही बाब आमच्या निदर्शनास येताच बाळाला तात्काळ संरक्षणाखाली घेऊन वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. सध्या मुलाची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news