कुलदीप सेन रातोरात बनलाय स्टार

कुलदीप सेन रातोरात बनलाय स्टार

मुंबई वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 3 धावांनी पराभव केला आणि पहिलाच सामना खेळणारा कुलदीप सेन राजस्थानच्या विजयाचा हीरो ठरला. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी 15 धावांची गरज होती. कुलदीप सेनने अप्रतिम गोलंदाजी करत बाजी मारली. आता तो 'रेवांचल एक्स्प्रेस' या नावाने ओळखला जाऊ लागला आहे.

कुलदीपचे वडील रामपाल सेन यांचे रेवा येथील सिरमौर चौकात केश कर्तनालय म्हणजेच सलून आहे. 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे झालेल्या आयपीएल 2022 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीला विकत घेतले. त्याचे प्रशिक्षक आहेत एरियल अँथनी. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी 15 धावांची गरज असताना नवोदित कुलदीप सेनवर सामना वाचवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. 19 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाला दोन षटकार आणि एक चौकार मारणार्‍या मार्कुस स्टॉयनिसला स्ट्राईकवर आणण्यासाठी आवेश खानने षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकच धाव घेतली. दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या चेंडूवर एकही धाव झाली नाही. स्टॉयनिसने 5 व्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

कुलदीपचे वडील सांगतात, मुलगा शिकायला जातो हे मला सुरुवातीला वाटत होते, पण जेव्हा त्याची जिल्हा संघात निवड झाली तेव्हा पत्नीने माझ्याकडे 500 रुपये मागितले आणि सांगितले की, मुलाला सिंगरौलीला जायचे आहे. मग समजले की, तो क्रिकेट खेळतोय. मी माझ्या मुलाला खडसावले तेव्हा तो मला म्हणाला की, पपा मलाही माझ्या करिअरची काळजी आहे, टेन्शन घेऊ नका. हे ऐकून दुसर्‍यांदा मी त्याला क्रिकेट खेळण्यापासून कधीच रोखले नाही.

कुलदीपचे प्रशिक्षक एरियल अँथनी म्हणाले, कुलदीप प्रथमच 2008 साली माझ्याकडे फलंदाजीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आला होता. त्याची उंची पाहून मी त्याला वेगवान गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. त्याने उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी सुरू केली. हळूहळू तो 140 कि.मी. वेगाने गोलंदाजी करण्यात पटाईत झाला. आता कुलदीपला रेवांचल एक्स्प्रेसच्या नावाने देशासाठी खेळताना पाहायचे आहे. कुलदीप गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून मी कधीही पैसे घेणार नाही, असे ठरवले होते. वेळोवेळी त्याला क्रिकेटपटू ईश्वर पांडे आणि झारखंडकडून रणजी खेळणारा आनंद सिंग यांचीही पूर्ण साथ मिळाली. वडील रामपाल यांनी सांगितले की, सततच्या चांगल्या कामगिरीमुळे कुलदीपची आयपीएलमध्ये निवड झाली. तीन मुलांपैकी तो मोठा आहे. त्याच्या दोन मोठ्या बहिणींचे लग्न झाले आहे. त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेला राजदीप पोलिस भरतीची तयारी करत आहे. धाकटा मुलगा इंजिनिअरिंग करत आहे.

अशी बहरली कारकीर्द

कुलदीप सेनने 2018 मध्ये रणजीमध्ये पदार्पण केले होते. कुलदीप सध्या मध्य प्रदेशच्या रणजी संघाचा नियमित सदस्य आहे. त्याने आतापर्यंत 14 रणजी सामन्यांमध्ये 43 बळी घेत छाप पाडली आहे. त्याने मुंबईविरुद्ध टी-20 मध्ये 5 आणि पंजाबविरुद्ध रणजीमध्ये 5 बळी घेऊन निवड समितीला स्वतःची दखल घ्यायला लावली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news