कोल्हापूर : फेरीवाला निधी लाभार्थ्यांचे सर्वेक्षण

File Photo
File Photo

कोल्हापूर; अनिल देशमुख : फेरीवाल्यांसाठी सुरू केलेल्या पथविक्रेता आत्मनिर्धर निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह सांगली-मिरज-कुपवाड, नागपूर आणि नाशिक या चार महापालिकांत हे सर्वेक्षण होईल. त्याद्वारे फेरीवाल्यांची पात्रता तपासून त्यांना अन्य योजनांचा लाभ देण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे.

1 जून 2020 पासून प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सुरू झाली. यामध्ये फेरीवाल्यांना केवळ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आता त्यापुढे पाऊल टाकून 'स्वनिधी से समृद्धी' असा उपक्रम केंद्राने हाती घेतला आहे. त्यासाठी आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. राज्यातील 24 महापालिका आणि 92 नगरपालिका, नगरपंचायतींत तीन टप्प्यांत हे सर्वेक्षण होईल. दुसर्‍या टप्प्यात 15 महापालिकांचा, तर तिसर्‍या टप्प्यात 9 महापालिका आणि 93 नगरपालिका, नगरपंचायतींत हे सर्वेक्षण होणार आहे. यासाठीचा खर्च केंद्राच्या गृहनिर्माण विभागाकडून केला जाणार आहे. तिसर्‍या टप्प्यात इचलकरंजी महापालिकेसह कागल, जयसिंगपूर, गडहिंग्लज नगर परिषद आणि हातकणंगले नगरपंचायतीचा समावेश आहे.

शिबिरे घेऊन व्यक्तिशः हा सर्व्हे केला जाईल. संबंधितांचे घर व इतर मालमत्ता, दिव्यांग, अपंगत्वाचा दर्जा, शिक्षण, कौशल्य, रोजगार, कुटुंबाचा व्यावसायिक दर्जा, स्थलांतर, बँकिंग, विमा यासह संबंधितांची अपेक्षा आदीचा सर्वेक्षणात समावेश असेल. यानुसार तयार होणारा फेरीवाल्यांचा डाटाबेस अन्य योजनांसाठीही वापरला जाणार आहे.

यानंतर 'स्वनिधी से समृद्धी'अंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, जनधन योजना, रूपे कार्ड, इमारत व इतर बांधकामअंतर्गत नोंदणीकरण, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन, एक राष्ट्र एक राशन कार्ड, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदींचा लाभ दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news