कोल्हापूर : सोशल मीडियाने तरुणाईला जखडले!

कोल्हापूर : सोशल मीडियाने तरुणाईला जखडले!
Published on
Updated on

कोल्हापूर, दिलीप भिसे : वय अवघं पाच-सहा वर्षाचं… अजून अक्षराची नेमकी ओळखही नाही… जेवणाची भ—ांत नाही की शाळेला जायचा पत्ता नाही. शाळेत गेले तर परतल्यानंतर कोपर्‍यात टाकलेल्या दप्तराचेही भान नाही. हातात मोबाईल पडला की लेकराला पहाटेपर्यंत झोपच नाही. शाळकरी अन् तरुणाईचीही तशीच तर्‍हा… तोंडावर चादर ओढायची अन् आई-वडिलांची नजर चुकवून मोबाईलमध्ये डोके खुपसून अख्खी रात्र जागून काढायची. सोशल मीडियाने तरुणाईला अक्षरश: जखडून टाकले आहे. अपडेट, लाईक, शेअर अन् फॉरवर्डपुरतेच काहींचे आयुष्य मर्यादित झाले आहे.

घानवडे (ता. करवीर) येथील सामान्य कुटुंबातील ऐन उमेदीतील 19 वर्षीय तरुण पब्जीच्या आहारी गेला. निद्रानाश, चिडचिडेपणा, एकटेपणा, शिवाय डिप्रेशनमुळे भेदरलेल्या तरुणाने तेरसवाड पैकी कदमवाडीच्या निर्जन जंगलात विष प्राशन करून आत्महत्या केली. दोन वर्षांत 'पब्जी' च्या आहारी जाऊन जीवनाचा शेवट करून घेतलेल्या जिल्ह्यातील हा तिसरा बळी… 'यमराज आला' हा त्याचा आयडी तुफान चर्चेत आला खरा; पण याच यमराजने ग्रामीण भागामधील सामान्य कुटुंबात हाता- तोंडाला आलेल्या ऐन उमेदीतील तरुणाचा बळी घेतला.

संशयकल्लोळ अन संसाराची वाताहत!

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे शहरासह ग्रामीण भागात अलीकडच्या काळात अनेक सुखी कुटुंबांच्या संसाराची वाताहत झाल्याचे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियाच्या वापरामुळे पती-पत्नी यांच्यात टोकाचे मतभेद होऊ लागले आहेत. अगदी पोलिस ठाण्यापासून कोर्ट कचेर्‍याही होऊ लागल्या आहेत. पोलिस मुख्यालयांतर्गत 'भरोसा' सेलकडे दिवसेंदिवस तक्रारीचा ओघ वाढू लागला आहे. सहा-सात महिन्यांच्या काळात साडेचारशेवर तक्रारी दाखल झाल्या आहेत. पथकातील महिला अधिकार्‍यांनी 190 पेक्षा अधिक जणांचे संसार पूर्वपदावर आणले आहेत. केवळ सोशल मीडियाचा अतिवापर आणि संशय कल्लोळामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊ लागले आहेत.

…तरीही भानावर नाहीत

ऑनलाईन गेममध्ये काहींनी स्वत:ला गुरफटून घेतले आहे. एसटी बस असो अथवा रेल्वे प्रवास… एव्हाना शेजारी कोण बसलंय याचेही भानही अनेकांना नसते. प्रवास संपेपर्यंत त्यांच्या मोबाईलचा स्क्रीन ऑफ झालेला नसतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत असतानाही काही जण भानावर येत नाहीत.

डिप्रेशन, निद्रानाशसह गंभीर आजार

सोशल मीडियाच्या अ‍ॅडिक्शनमुळे आपापसातील संवाद कमी होऊ लागला आहे. एकाकीपणा वाढीस लागला आहे. सोशल मीडियावर व्यस्त असताना एखादी नावडती गोष्ट कानावर आली अथवा व्यत्यय निर्माण झाला तर शीघ्र कोपी बनणे, तीव्र संताप व्यक्त करणे अथवा हातून एखादे गंभीर कृत्य घडणे यांसारख्या घटनाही समाजात घडू लागल्या आहेत. त्यात निद्रानाश, नैराश्य, चिडचिडेपणामुळे कौटुंबिक वातावरण बिघडू लागले आहे.

सोशल मीडियाचे व्यसन!

15 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर हा सामाजिकदृष्ट्या चिंतेचा विषय बनला आहे. सकाळपासून मध्यरात्र म्हणजे डोळ्यावर ताण येईपर्यंत मोबाईलचा वापर केला जात आहे. अनेकांना समाजमाध्यमांचे अक्षरश: व्यसन लागले आहे.

शहर, ग्रामीण भागातही दुष्परिणाम !

इंटरनेटसह स्मार्टफोनचा वापर सध्या गरजेचा बनला आहे. मात्र या साधनांचा गैरवापर धोकादायक ठरू लागला आहे. विशेषत: तरुणाईत त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत. कॉलेज, बस, रेल्वेस्थानक, उद्याने, नदीकाठांवर, निर्जन ठिकाणांसह महामार्गावर, स्मशानभूमीतही तरुणांच्या झुंडीच्या झुंडी ऑनलाईन गेम्स खेळताना सर्रास दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news