कोल्‍हापूर : शिरगावच्या सख्ख्या बहिणी झाल्‍या पोलिस; शेतकरी बापाचे स्‍वप्न केले साकार

सख्ख्या बहिणी झाल्‍या पोलिस
सख्ख्या बहिणी झाल्‍या पोलिस

विशाळगड : सुभाष पाटील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव गावातील प्राजक्ता देवानंद न्यारे व प्रतीक्षा देवानंद न्यारे या सख्ख्या बहिनींनी पोलीस भरतीत बाजी मारली. तसेच त्याच गावातील प्रकाश जगनाथ खोंगे या युवकानेही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केल्याने तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समाजात मुलापेक्षा मुलगी बरी, असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात मुलाचाच हट्ट धरला जातो. हे वास्तव नाकारता येत नाही. असे असतानाही शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील देवानंद यशवंत न्यारे यांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार व शिक्षण देऊन नोकरीला लावले. एक नव्हे तर चक्क दोनही मुली एकाच वेळी मुंबई पोलिस परीक्षेत पास झाल्या. प्राजक्ता देवानंद न्यारे आणि प्रतीक्षा देवानंद न्यारे अशा सख्ख्या बहिणींची नावे आहेत. सख्ख्या दोन्ही बहिणी समाजासमोर एक आदर्श ठरत आहेत.

शिरगाव येथील शेतकरी देवानंद न्यारे व रवींद्र देवानंद न्यारे हे सख्ये भाऊ प्रगतशील शेतकरी. त्यापैकी शेतकरी देवानंद न्यारे यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांनी दोनही मुलींना चांगल्या संस्कारासोबतच त्‍यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट सतत त्यांच्या डोळ्यासमोर ठेवले. त्यामुळे या दोन बहिणींनी जिद्द व चिकाटीमुळे शिक्षण व त्यानंतर पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे या दोन्ही बहिणी मुंबई पोलिस दलाची परीक्षा पास झाल्या आहेत.

जिद्द, चिकाटीमुळे यशाला गवसणी 

मुलगा असो किंवा मुलगी चांगले संस्कार, जिद्द व चिकाटी असली की अशक्‍य काहीच नसते याचा आदर्श समाजाने घ्यायला हवा. प्राजक्ता (वय २२), प्रतीक्षा (वय २०) या दोघींचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्री बालदास महाराज विद्यालयात झाले. प्राजक्ताचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले असून, प्राजक्ता सेकंड इयरला आहे. शिक्षणासोबतच दोघींनी नोकरीची जिद्द मनात ठेवून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे दोन्ही बहिणी पोलिस भरतीत शिपाई पदाकरिता पात्र ठरल्या. दोघींनीही प्रभात करिअर अकॅडमीचे विनोद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येळाणे येथे प्रशिक्षण घेतले. सातत्य, अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा या पंचसूत्रीच्या जोरावर या दोघींनी यश संपादन केले. त्यांना आई-वडीलांसह काका रवींद्र न्यारे यांनी पोलीस भरतीसाठी प्रोत्साहन दिले.

प्रकाश खोंगेही झाला पोलीस 

गावातीलच प्रकाश जगनाथ खोंगे या युवकानेही पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. प्रकाशचे वडीलही शेतकरी असून, ग्रामपंचायतीमध्ये गावाला पाणी सोडण्याचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीत प्रकाशने आपल्या आयुष्यात प्रकाश पाडला आणि पोलीस बनला त्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

या तिघांची फिजिकल टेस्ट फेब्रुवारी २०२३ मध्ये पार पडली. ७ मे २०२३ रोजी त्यांनी अंतिम परीक्षा दिली. १७ मेरोजी निकाल जाहीर झाला. त्यामध्ये तिघेही पोलीस भरतीत शिपाई पदाकरिता पात्र ठरले.

तालुक्यात अनेकांची पोलीस भरतीत बाजी

अमोल गाडे (पेरीड- गाडेवाडी), कमलेश यादव (भोसलेवाडी), प्रथमेश भोसले (भोसलेवाडी), किशोर भोसले(भोसलेवाडी ), करण यादव (भोसलेवाडी ), आदिनाथ श्रीखंडे (हुपरी ),अक्षय पाटील (सोंडोली ), प्रकाश जाधव (चनवाड), सुरज पवार (पणूद्रे ), प्राजक्ता न्यारे(शिरगांव), प्रतीक्षा न्यारे (शिरगांव ), प्राजक्ता पाटील(सावे ), कोमल लाळे (लाळेवाडी), पूजा कदम (अमेनी), स्वाती पाटील (वारूळ), रविना बजागे (बजागेवाडी). या सर्वांना प्रभात करिअर प्रभात करिअर अकॅडमी, मलकापूरचे विनोद भोसले (पेरीडकर) यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news