कोल्‍हापूर : मालाईचा धनगरवाडा होणार ‘मधमाशांच्या संवर्धनाचे गाव’; शास्त्रोक्त पध्द्तीने संवर्धन

मधमाशांच्या संवर्धनाचे गाव
मधमाशांच्या संवर्धनाचे गाव

विशाळगड : सुभाष पाटील शाश्वत रोजगार आणि संवर्धनाच्या मोहिमेसाठी नाविन्यपूर्ण वनअमृत प्रकल्पाचा विस्तार कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये नियोजनबद्ध करण्यात येत आहे. यातील एक भाग म्हणजे मधमाशी संवर्धन प्रकल्प. शास्त्रोक्त पध्दतीने मधाचे संकलन करणे हा यातील महत्वाचा भाग असून, शाहूवाडी तालुक्यातील मालाईचा धनगरवाड्यावरील परंपरागत मधपाळांना प्रशिक्षण व साहित्य दिले जाणार आहे. यातून मधमाशा संवर्धन होण्यास मदत होणार असल्याने मालाईचा धनगरवाडा हे 'मधमाशा संवर्धनाचे गाव' म्हणून भविष्यात ओळखले जाईल.

प्राथमिक टप्प्यात मालाईचा धनगरवाड्यासह येळवनजुगाई तसेच तालुक्यातील शंभर मधपाळांना याचे प्रशिक्षण, शास्त्रोक्त माहिती, प्रबोधन करून त्यांना प्रकल्पात सहभागी केले जाणार आहे. महिला बचत गटांचाही यामध्ये सहभाग घेतला जाईल. जंगलातील मधमाशा जानेवारी ते जून या महिन्याच्या कालावधीत जंगलात वसाहती करून स्थायिक असतात. त्यांच्याकडून निसर्गात परागीभवनाचे काम होते. त्यामुळे मानवाने मधमाशांचे निसर्गातील स्थान अबाधित ठेवले पाहिजे. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर मधमाश्या या पाऊस कमी असलेल्या ठिकाणी स्थलांतरित होतात. त्यांचा सहा महिन्यांचा प्रवास हा पर्जन्यमान कमी असलेल्या ठिकाणी होतो. तो प्रवास पन्नास ते तीनशे किलोमीटर पर्यंत असतो. परंतु आज जागतिक तापमान वाढ, विकासकामे, वृक्षतोड यामुळे मधमाश्यांना अशा ठिकाणी थांबणे अडचणीचे झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मधमाशां संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात मधमाश्या संवर्धनाला गती दिली जाणार आहे.

'मधाचे गाव' या उपक्रमांतर्गत गावात मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने विशाळगड, पावनखिंडला येणाऱ्या पर्यटकांना व ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिले जाते. मधमाशांमुळे पीक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.

मधमाश्या संवर्धन म्हणजे केवळ मध संकलन नव्हे. संकलन करताना शास्त्रोक्त पध्दतीचा वापर हवाच. पण त्याबरोबर यातून एक एक मधमाशी वाचवली जाईल. तसेच मधमाश्यापासून रॉयल जेली, डंख, मेण, मधमाश्यांच्या वसाहती विक्री करणे हे अनुचित अनैसर्गिक प्रकार केले जाणार नाहीत. वन्यजीव कायद्याअंतर्गत या प्रकल्पातून कोणतेही फायदे व  नियमांचे उल्लंघन केले जाणार नाही.
डॉ योगेश फोंडे, संशोधक, मधमाशी संवर्धन प्रकल्प

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news