Kolhapur Crime News : तरुणीचा खून! लग्न करण्यास नकार दिल्याने आई, भाऊ, मामाने मिळून केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न कर किंवा प्रेमसंबंध तोडून टाक, असे वारंवार सांगूनही ऐकत नसल्याच्या रागातून आई, भाऊ आणि मामाने केलेल्या बेदम मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय 24, रा. शनिवार पेठ) या तरुणीचा मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री उशिरापर्यंत सळी, काठीने या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात आणले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर खुनाची ही गंभीर घटना उघडकीस आली. (Kolhapur Crime News)

याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आई शुभांगी लक्ष्मण पोवार, भाऊ श्रीधर पोवार (दोघे रा. शनिवार पेठ), संतोष बबन आडसुळे (मूळ रा. इचलकरंजी, सध्या रा. देवठाणे, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

Kolhapur Crime News : लग्न करण्यास नकार दिल्याने…

शनिवार पेठेतील पोवार कुटुंबीयांचे पापाची तिकटी येथे चप्पलचे दुकान आहे. या कुटुंबातील वैष्णवी हिचे पुण्यातील वैभव शेळके (रा. कात्रज) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. वैष्णवी हिच्या आईला या प्रेमसंबंधाची माहिती होती. बुधवारी सकाळी मुलीला घेऊन शुभांगी या पुणे येथे मुलाच्या घरी गेल्या होत्या. तुम्ही दोघे लग्न करा किंवा तुमचे प्रेमसंबंध तोडा, असे त्या वैैष्णवी आणि वैभव यांना वारंवार सांगत होत्या. यावरून त्यांच्यात वादही होत होता. परंतु वैष्णवी आणि वैभव हे दोघेही लग्न करायला तयार नव्हते. त्यांना रिलेशनशिपमध्ये मात्र राहायचे होते. मुलीचे हे विचार आईला पसंत नव्हते. बुधवारी दुपारी ते पुण्याहून कोल्हापूरकडे आले. रात्री कोल्हापुरात पोहोचल्यानंतर वैष्णवी आणि मुलगा श्रीधरला घेऊन शुभांगी या भाऊ बबन आडसुळे यांच्या देवठाणे (ता. पन्हाळा) येथील घरी गेल्या. वैष्णवीला तिथेही समजावण्याचा प्रयत्न केला. वैष्णवी ऐकायला तयार नसल्याने आई शुभांगी यांनी तिला बेदम मारहाण केली. काठी, सळीने केलेल्या मारहाणीमुळे वैष्णवी गंभीर जखमी अवस्थेत पडली. गुरुवारी सकाळी तिला कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात आणले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. बेदम मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी आई, भाऊ आणि मामावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खुनाची फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील यांनी दिली आहे. तिघांना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर शनिवार पेठ आणि परिसरात एकच खळबळ माजली. गुरुवारी रात्री वैष्णवीवर येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news