कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरात आज (दि. ४) सायंकाळी तरुणाचा पाठलाग करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. रंकाळा परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यादवनगरातील दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून अजय दगडू शिंदे ऊर्फ रावण (वय 35, रा. यादवनगर) या तरुणाचा चार ते पाच हल्लेखोरांनी एडका, कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी डोक्यावर, पाठीवर सपासप वार करून निर्घृण खून केला. गर्दीने गजबजलेल्या रंकाळा टॉवरजवळ चौपाटीवर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा सहाजणांना ताब्यात घेण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी झालेले भांडण मिटविण्यासाठी अजय शिंदे व त्याच्या मित्राला रंकाळा टॉवरजवळ बोलवले होते. त्यानुसार अजय त्याचा मित्र आकाश शिंदेसोबत तेथे आला असता चार ते पाच तरुणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये अजय जागीच ठार झाला.
हेही वाचा