खंडाळा : किसनवीरचा जरंडेश्वर होऊ देऊ नका

खंडाळा : किसनवीरचा जरंडेश्वर होऊ देऊ नका
Published on
Updated on

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा

खंडाळ्यात कारखाना उभारताना अडचणी आणल्या. मात्र कारखाना उभा राहिल्यानंतर लगबगीने निवडणुकीच्या रिंगणात आले. मतदारांचा कौल मान्य करुन दुसर्‍या दिवशी खंडाळा कारखाना नव्या व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यायची तयारी दर्शवली. मात्र सगळं काही हाती असूनही खंडाळा बंद ठेवला. तेच आता किसन वीर कारखान्याबाबत चाललं असून हा कारखाना ताब्यात घेवून तो केवळ कोणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आखला आहे. मात्र तो डाव कधीच यशस्वी होणार नाही, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी खंडाळा येथे व्यक्त केला. दरम्यान, आ. महेश शिंदे यांनीही मतदारांना किसनवीरचा जरंडेश्वर कारखाना होवू देवू नका, असे आवाहन केले आहे.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त खंडाळा व भुईंज येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मदन भोसले म्हणाले, किसन वीर कारखान्याला काडीची मदत तर कधी केली नाहीच उलट अडचणी आणून हा कारखाना कसा बंद पडेल, याचे प्रयत्न केले. राज्य सहकारी बँकेतून कर्ज मंजूर झालं होतं. मात्र ते रोखलं यांनीच. तसलं सुडाचं राजकारण यांना नेहमी जमतं. माझा ते द्वेष करतात तो द्वेष एकवेळ मला चालेल पण शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्याचं पाप का करताय? ही संस्था 52 हजार शेतकर्‍यांच्या मालकीची आहे, याचेही भान त्यांना राहिले नाही. हा कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे आणि माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तो शेतकर्‍यांच्याच मालकीचा राहिल. मी तिथे शरण जात नसल्याने यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून कारखाना बळकावून तो कोणाच्या तरी पायावर वाहण्याचा डाव आखला असून तो उधळून लावा. किसन वीर कारखान्याचा कारभार करताना प्रतापगड सहकारात ठेवला, खंडाळ्याचा कारखाना उभारला. 3 डिस्टिलरी, सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल असे अनेक उपक्रम उभारले. यांनी आजपर्यंत एखादी पतसंस्था उभारली का? प्रतापगड हडपायचा होता तो यांनाच. आज तो वाचवताना, खंडाळा उभारताना किसन वीरवर ताण जरुर आला. मात्र शेजारचं घर जळत असताना बघ्याची भूमिका घेणारा मी नाही. अडचणीवर मात करण्याची धमक असून त्यामुळेच रणांगण सोडून पळून गेलो नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी ठणकावले.

यावेळी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, धनाजी डेरे, नारायण पवार, सीए सी. व्ही. काळे, रतनसिंह शिंदे, दत्तात्रय गाढवे, बापूराव धायगुडे, विशाल धायगुडे, हर्षवर्धन शेळके पाटील, सतीश भोसले, पं. स. सदस्य दीपक ननावरे, विराज शिंदे, अनुप सूर्यवंशी, शेखर भोसले पाटील, पं. स. सदस्य चंद्रकांत यादव उपस्थित होते. खंडाळा येथील मेळाव्यात अनिरुद्ध गाढवे यांनी तर भुईंजच्या मेळाव्यात भैय्यासाहेब जाधवराव यांनी स्वागत केले.

विरोधकांकडून गोबेल्स नितीचा वापर

जिल्ह्यातील सहकाराला वेढा पडला असून पावणेचारशे कोटीचा जरंडेश्वर कारखाना कवडीमोलाने घेतला. टेंडरही न काढता तो गुरु कमोडीटीला दिला. तिथेही आधी आवई उठवली की कारखाना डॉ. शालिनीताईंंच्या नातेवाईकांनी खाल्ला. ज्या नातेवाईकांवर हे घाणेरडे आरोप केले त्या नातेवाईकांचे इमले उभे राहिले की जमिनी विकायला लागल्या ते जरा बघा. आज डॉ. शालिनीताई यांची उपजिविका पेन्शनवर सुरु आहे. त्यांनी कारखाना खाल्ला असता तर या अवस्थेत त्यांना रहावे लागले असते का? गोबेल्स नितिचा वापर करुन तद्दन खोटेपणा करुन हा कारखाना गिफ्ट दिल्याप्रमाणे कोणाला तरी दिला. आज तोच डाव किसन वीर बाबत टाकला असल्याची टिका आ. महेश शिंदे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news