Kashmiri Hindu Genocide : भारत सरकारने 30 वर्षानंतर पुन्हा उघडली ‘काश्मिरी पंडित नीलकंठ गंजू’ यांच्या निर्घृण हत्येची केस

Kashmiri Hindu Genocide
Kashmiri Hindu Genocide

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kashmiri Hindu Genocide : काश्मीरमध्ये 90 च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहारात काश्मिरी पंडित निवृत्त न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची नृशंस हत्या करण्यात आली होती. ही घटना नरसंहाराच्या सर्वात वाईट घटनांपैकी एक मानली जाते. त्यांनी मकबूल भट या जेकेएलएफच्या संस्थापकाला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचा बदला म्हणून दिवसाढवळ्या नीलकंठ गंजू यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भारत सरकारने आज 34 वर्षानंतर हा खटला पुन्हा उघडला आहे. एसआयए याचा तपास करणार आहे.

घटनेच्या 34 वर्षानंतर ही केस पुन्हा उघडली गेली आहे. त्यावर नीलकंठ गंजू यांच्या नातेवाईकांसह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही आपले मत नोंदवले आहे. गंजू यांची मुलगी उर्मिला रैना यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तसेच ती म्हणाली, ही चांगली बातमी आहे. माझ्या वडिलांच्या हत्येसाठी दोषी दहशतवाद्यांना अटक करून त्यांना शिक्षा व्हावी, एवढीच माझी इच्छा आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने आमचे ऐकले नाही, असे म्हटले आहे.

Kashmiri Hindu Genocide : आमच्या मनात आशावादाची भावना पुन्हा जागृत झाली – स्वप्ना रैना

गंजू यांची नात स्वप्ना रैना यांनी सांगितले की, तीन दशकांहून अधिक जुना खटला पुन्हा उघडल्याने "आशेचा किरण" आला आहे. या विषयावर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "भारत सरकारच्या 1989-90 च्या काश्मिरी हिंदू नरसंहार प्रकरणाची 34 वर्षांनंतर पुन्हा पाहणी करण्याचा निर्णयाने माझ्या मनात संमिश्र भावना निर्माण झाल्या आहेत.

नरसंहारातील अनेक प्रकरणांमध्ये, पुन्हा तपास सुरू होणाऱ्या खटल्यांमध्ये माझे प्रिय आजोबा न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्या हत्येच्या तपासाचा पहिलाच खटला आहे. 4 नोव्हेंबर 1989 रोजी जेकेएलएफ (JKLF) दहशतवाद्यांचे ते बळी ठरले होते. या निर्णयामुळे माझ्या  आणि माझ्या समाजाच्या मनात आशावादाची भावना पुन्हा जागृत झाली आहे. कारण आम्ही काश्मिरी हिंदूंनी ज्या वेदना सहन केल्या त्या लोकांनी शेवटी ऐकाव्यात, ते मान्य करावे, सहानुभूती दाखवावी आणि समजून घ्यावे, अशी आमची इच्छा होती.

एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात, रैनाने सांगितले की न्यायमूर्ती नीलकंठ गंजूची केस पुन्हा उघडणे ही शेकडो प्रकरणांपैकी एक असेल जी न्यायाची वाट पाहत असलेल्या कुटुंबांना दिलासा देईल.

Kashmiri Hindu Genocide : आता खूप उशीर झाला आहे – एस के गंजू

तथापि, "घटनेच्या 34 वर्षांनंतर आता खूप उशीर झाला आहे. आता आम्हाला आमच्या जखमा पुन्हा खाजवायला नको आहेत," असे माजी न्यायमूर्ती एस.के. गंजू यांनी माध्यमांना सांगितले.

Kashmiri Hindu Genocide : तथ्यांची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावे; एसआयए चे आवाहन

तीन दशकांपूर्वी निवृत्त न्यायाधीश, नीलकंठ गंजू यांच्या हत्येमागील मोठा गुन्हेगारी कट उघड करण्यासाठी, राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) या हत्या प्रकरणातील तथ्ये किंवा परिस्थितीची माहिती असलेल्या सर्वांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) एका निवेदनाद्वारे, या खून प्रकरणातील तथ्ये किंवा परिस्थितीची माहिती असलेल्या सर्व व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तसेच तत्काळ तपासावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकेल अशा घटनांचा तपशील शेअर करावा.

निवेदनात पुढे म्हटले आहे की माहिती देणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पूर्णपणे निनावी आणि संरक्षित ठेवली जाईल आणि सर्व उपयुक्त आणि संबंधित माहिती योग्यरित्या पुरस्कृत केली जाईल. हत्येशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी लोकांना 8899004976 किंवा sspsia-kmr@jkpolice.gov.in या ईमेलवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news