बेळगावात पोलिसांची दडपशाही : महामेळाव्याला परवानगी नाकारली, मंडपाचे साहित्‍य जप्त, म. ए. समितीच्या नेत्‍यांना अटक

बेळगावात पोलिसांची दडपशाही
बेळगावात पोलिसांची दडपशाही

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारून दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज (सोमवार) सकाळपासून या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. व्हॅक्सिन डेपो येथे महाराष्‍ट्र एकीकरण समितीकडून उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य कर्नाटक पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या या दादागिरीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

विधिमंडळ अधिवेशनाविरोधात दरवर्षी महाराष्ट्र एकिकरण समिती मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करीत असते. याही वेळी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी ही मागितली होती. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाने आज सकाळी साडेआठ वाजता तुम्हाला परवानगी नाही, तुम्ही महामेळावा घेऊ शकत नाही, असे सांगून मराठी भाषिकांवर दबाव करण्याचा प्रयत्न केला.

काल रात्रीपर्यंत तोंडी परवानगी देणाऱ्या पोलिसांनी आज अचानक दादागिरीची भाषा सुरू केली. याशिवाय राज्याचे एडीजीपी अलोक कुमार यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानावर जाऊन सर्व साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. काल जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खासदार धैर्यशील माने आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर बंदी आदेश बजावला होता. आज महामेळाव्याला परवानगी नाकारून प्रशासनाने दादागिरी सुरू केली आहे. प्रशासनाच्या या मनमानी भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह महामेळावा स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मेळव्यासाठी उभारण्यात आलेला मंडप काढण्याची सूचना समिती नेत्यांना पोलिसांनी केली आहे.
कर्नाटक सरकारने यापूर्वीच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी करून सीमेवरील नाक्यांवर बंदोबस्त वाढवला आहे. त्यानंतर पोलीस बळाचा वापर करून लोकशाही मार्गाने महामेळावाच्या माध्यमातून उमटणारा हुंकार दडपण्याचा प्रयत्न चालवल्याने महाराष्ट्र सरकार याबाबत काय भूमिका घेणार याकडे सीमावासियांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news