Karnataka Congress: दिल्लीत कर्नाटक सरकारची केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने

Karnataka Congress: दिल्लीत कर्नाटक सरकारची केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्राच्या कर संकलनातून मिळणाऱ्या अल्प परताव्यावर कर्नाटक सरकारमध्ये असलेली नाराजी व्यक्त करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज दिल्लीत जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केली. करामध्ये कर्नाटकचे योगदान ४.३० लाख कोटी रुपयांचे असून कर्नाटकला निधीमध्ये न्याय्य वाटा मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. Karnataka Congress

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना केंद्र सरकारव दबाव वाढविण्यासाठी जंतरमंतरवरील निदर्शनांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रीमंडळ सहभागी झाले होते. कर्नाटककडून घेतल्या जाणाऱ्या दर १०० रुपयांपैकी केवळ १२ रुपये परत मिळत आहेत, अशी टिका सिद्धरामय्या यांनीकेली. ते म्हणाले, की केंद्राकडून होणाऱ्या करसंकलनामध्ये महाराष्ट्र प्रथम तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, कर्नाटकमधून यावर्षी ४.३० लाख कोटी रुपये कर मिळाल्याचा दावाही सिद्धरामय्या यांनी केला. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, की कर्नाटक हे देशाला सर्वाधिक महसूल देणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. हा विरोध कर्नाटकच्या लोकांच्या हक्कासाठी आहे. गुजरातला ज्याप्रमाणे केंद्र सरकारने योजना दिल्या आहेत, तशाच योजना कर्नाटकलाही मिळाव्यात अशीही मागणी उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केली. Karnataka Congress

दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकमधील कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी दावा केला, की दुष्काळी स्थितीत मदतीचा १८ हजार कोटी रुपयांचा निधी कर्नाटकला मिळालेला नाही, मनरेगातील कामकाजाच्या दिवसांची संख्या १०० वरून १५० दिवसांवर आणावी, अशी मागणीही केंद्राने अद्याप मान्य केली नसल्याची नाराजी प्रियांका खरगे यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस नेते सलीम अहमद यांनीही कर्नाटकचा केंद्राकडे मागील चार वर्षांपासून निधी थकला असल्याचा दावा केला. तर, कर्नाटकचे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटकमध्ये २३६ पैकी २२० तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याकडे लक्ष वेधले.

Karnataka Congress : कर्नाटकचे कॉंग्रेस सरकार खोटारडे – भाजप

दरम्यान, कर्नाटक सरकारच्या या निदर्शनांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांनी खिल्ली उडविली. कर्नाटकचे काँग्रेस सरकार खोटे बोलणारे सरकार आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात, तर काँग्रेस भारत तोडो यात्रा काढत आहे. असा टोला त्यांनी लगावला. दुसरीकडे, कर्नाटक सरकारने निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करून भाजपच्या कर्नाटकमधील खासदारांनी संसदेतील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. भाजपचे खासदार लहारसिंह यांनी कर्नाटक सरकारमध्ये अंतर्गत वाद सुरू असून उपमुख्यमंत्री डी के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्या वादातून दिल्लीत निदर्शने केली जात आहेत. ही निदर्शने सोनिया गांधी, राहुल गांधींच्या विरोधात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news