कराड : पुढारी वृत्तसेवा
वडगाव हवेली (ता. कराड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा भुवनेश्वर, ओरीसा येथे मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली. संबंधितांचे मृतदेह गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. घातपात झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह जमावाने शुक्रवार दि. 29 रोजी रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलीस ठाण्यात आणून तेथेच ठिय्या मांडला. यावेळी जमाव आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांनी जमावाशी चर्चा करत नातेवाईकांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी भुवनेश्वर येथील पोलीस ठाण्यात खुनाचा व आत्महत्येचा गुन्हा नोंद झाला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
तुषार राजेंद्र जगताप (वय26), पत्नी नेहा तुषार जगताप (वय 21) व मुलगी शिवन्या तुषार जगताप (वय दीड वर्षे, सर्व मुळ रा. वडगाव हवेली, ता. कराड) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, वडगाव हवेली येथील तुषार जगताप हा युवक भुवनेश्वर ओरीसा येथे आपली पत्नी नेहा व मुलगी शिवन्या यांच्यासह राहत होता. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी तिघांचेही मृतदेह आढळून आले. याची नोंद तेथील पोलिसात झाली आहे. भुवनेश्वर, ओरीसा येथे मयताची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तिघांचेही मृतदेह रुग्णवाहिकेतून कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे त्यांच्या गावी आणण्यात आले. येथे आल्यानंतर नातेवाईकांना हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याचे व त्यांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे गावी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर जमावाने मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून व आक्रमक झालेला जमाव पाहून डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील हे त्वरित पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी जमावाबरोबर चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर नातेवाईकांसह जमावाला योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करत त्यांच्या शंकाचे निरसन केले. तसेच त्यांचा तक्रार अर्ज घेतल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वडगाव हवेली येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले.
या घटनाक्रमामुळे वडगाव हवेलीसह कार्वे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांच्या शंकांचे निरसण करत त्यांना शांत केल्याने तणाव निवळला. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असून याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.