के. एल. राहुलला नातेवाईकांची भीती

K. L. Rahul
K. L. Rahul

नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अगदीच तोंडावर आली असताना प्रत्येक खेळाडूला आपापल्या फॉर्मची आणि खेळाची चिंता लागली आहे, पण प्रभारी कर्णधार के. एल. राहुल याला मात्र वेगळीच भीती वाटत असून वर्ल्डकपच्या तिकिटांसाठी गळ घालणार्‍या नातेवाईक व मित्रांना कसे टाळायचे याच्या विवंचनेत तो आहे. आपण तिकिटासाठी कुणालाही उत्तर देणार नसल्याचे त्याने आधीच स्पष्ट केले आहे. सध्या राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 5 गडी राखून शानदार विजय मिळवला.

'जिओसिनेमा'शी बोलताना राहुलने विश्वचषकाच्या तिकिटासाठी कोणालाच उत्तर देणार नसल्याचा स्पष्ट संदेश कुटुंबीय आणि जवळच्या लोकांना दिला आहे. के.एल. राहुल म्हणाला की, वर्ल्डकप तिकिटांबाबत मला कोणीही मेसेज करू नये. जर कोणी मला सामन्याच्या तिकिटासाठी मेसेज केला तर मी त्याला प्रतिसाद देणार नाही. इथे गर्विष्ठ किंवा उद्धट होण्याचा प्रश्न नाही फक्त या सर्वांपासून दूर राहण्याचा आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न आहे. हा संदेश माझ्या सर्व कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी आहे. तुम्ही मला तिकिटांसाठी मेसेज करण्याचा विचार करत असाल तर, कृपया करू नका.

यष्टिरक्षण आव्हानात्मक

याशिवाय राहुलने फलंदाजी आणि विकेटकिपिंगसाठी स्वत:ला कसे तयार केले याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, मला माहीत आहे की, मी संघात चांगले पुनरागमन केले आहे, त्यामुळे मला फलंदाजी आणि किपिंग करावी लागेल. मी नुकतीच जरा बरी फलंदाजी करतो आहे, पण त्यापेक्षा विकेटकिपिंग करणे हे खूप मोठे शारीरिक आव्हान आहे. मला हे माहीत होते, त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. एक क्रिकेटपटू म्हणून, आम्हाला माहीत आहे की, आम्हाला मैदानावर कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आम्ही सराव आणि प्रशिक्षण सत्रांमध्ये जे केले त्याचीच पुनरावृत्ती सामन्यात करण्याचा प्रयत्न करतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news