‘इस्रो’ रविवारी लाँच करणार नवे रॉकेट ‘SSLV’

‘इस्रो’ रविवारी लाँच करणार नवे रॉकेट ‘SSLV’

नवी दिल्‍ली: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) लवकरच देशाचे नवे रॉकेट लाँच करणार आहे. या रॉकेटचे नाव आहे 'स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल' (एसएसएलव्ही). आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून 7 ऑगस्टला सकाळी 9.18 वाजता हे रॉकेट लाँच केले जाणार आहे. हे रॉकेट अर्थ ऑब्झर्व्हेशनल सॅटेलाईटला (इओएस-02) अंतराळात सोडण्याचे कार्य करील. तसे पाहता आपले सॅटेलाईटस् अंतराळात सोडण्यासाठी 'इस्रो'कडून 'जीएसएलव्ही' किंवा 'पीएसएलव्ही'चा वापर केला जातो. मात्र, यावेळी 'एसएसएलव्ही'चा वापर केला जात आहे. छोट्या सॅटेलाईटस्ना अंतराळात सोडण्यासाठीच हे रॉकेट वापरले जाणार आहे. या रॉकेटची लांबी 112 फूट, व्यास 6.7 फूट आणि वजन 120 टन आहे. या रॉकेटच्या सहाय्याने सुमारे 500 किलो वजनाचे सॅटेलाईटस् पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटपर्यंत (खालील कक्षा) नेले जाऊ शकतात.

'पीएसएलव्ही' रॉकेट 1750 किलो आणि 'जीएसएलव्ही' 4 हजार किलोपर्यंतचे वजन अंतराळात नेऊ शकते. 'एसएसएलव्ही' अंतराळात सोडण्याची योजना कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीच आखण्यात आली होती. मात्र, महामारी व लॉकडाऊनमुळे या योजनेला विलंब झाला. 'इओएस-02' हा असा कृत्रिम उपग्रह आहे ज्याच्या माध्यमातून कृषी, वन, भूविज्ञान आणि जल विज्ञानामधील भारताच्या नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन होऊ शकेल. या मायक्रो सॅटेलाईटला 'इस्रो'नेच विकसित केले आहे. 'एसएसएलव्ही'ची ही मोहीम 'इस्रो'प्रमुख एस. सोमनाथ यांच्याच कल्पनेतून साकारलेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news