नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने नुकतीच 'इंडिया स्मार्ट सिटी पुरस्कार-२०२२' ची घोषणा केली. देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत अव्वल असलेले मध्यप्रदेशातील इंदुर शहराला 'बेस्ट नॅशनल स्मार्ट सिटी' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांमध्ये मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केंद्रातील सरकारने केल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
इंदुर पाठोपाठ गुजरात मधील 'सूरत' आणि उत्तर प्रदेशातील 'आगरा' अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. पहिल्या तीन शहरे असलेल्या राज्यांमध्ये भाजपची सरकार आहे हे विशेष. स्मार्ट सिटी मिशन लागू करण्यात मध्यप्रदेशने 'सर्वोत्कृष्ट राज्य' पुरस्कार मिळवला, तर तामिळनाडूने दुसरा क्रमांक पटकावला. कॉंग्रेस शासित राजस्थान आणि भाजप शासित उत्तर प्रदेश संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर राहिले. केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत चंदीगढ क्रमांक एकवर राहिला.
केंद्रीय शहर विकास मंत्रालयाने 'इंडिया स्मार्ट सिटी पुरस्कार-२०२२' अंतर्गत विविध श्रेणींमध्ये एकूण ६६ विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. मंत्रालयाकडून देशातील १०० स्मार्ट सिटीची नावे जाहीर करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर रोजी इंदुरमध्ये आयोजित समारंभातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. पर्यावरण श्रेणीत कोयंबतूर, तर संस्कृती श्रेणीत अहमदाबाद पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडला उत्कृष्ट प्रशासनासाठी पहिल्या क्रमांकाने सन्मानित केले जाईल.