Automotive industry : वाहन उद्योगाची भरारी

Automotive industry : वाहन उद्योगाची भरारी
Published on
Updated on

अमेरिकेतील डेट्रॉईट या शहराची जगभरात ऑटोमोबाईल उद्योगाबाबत ख्याती आहे. जगभर हे शहर मोटारसिटी म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये परवाना राज असल्यामुळे आणि दोन -तीन कंपन्यांनाच कार बनवण्याची परवानगी असल्यामुळे हा बदल भारतात उशिरा झाला. पण आज भारताने वाहन निर्मितीच्या क्षेत्रात भरारी घेतली आहे. भारत सध्या जगातील सर्वात मोठा ट्रॅक्टर उत्पादक, दुसरा सर्वात मोठा बस उत्पादक आणि तिसरा सर्वात मोठा अवजड ट्रक उत्पादक आहे. येत्या काही वर्षांत ई-कारच्या निर्मितीत भारत तिसर्‍या क्रमांकावर असेल.

अमेरिकेतील डेट्रॉईट शहराला अमेरिकेच्या औद्योगिक परिवर्तनाचे श्रेय दिले जाते. याचे मूळ कारण म्हणजे येथे ऑटोमोबाईल उद्योगाची झपाट्याने भरभराट झाली आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार तर मिळाला. यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालनाही मिळाली. उद्योजक हेन—ी फोर्ड यांनी पुढाकार घेतला आणि दुसर्‍या महायुद्धानंतर प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त व्यावसायिक वाहनांचीही येथे मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली. यामुळेच जगभर हे शहर 'मोटारसिटी' म्हणून ओळखले जाऊ लागले. भारतात परवाना राज असल्यामुळे आणि काही कंपन्यांनाच कार बनवण्याची परवानगी असल्यामुळे हा बदल भारतात उशिरा झाला. साधारणतः 1980 च्या दशकात एक नवीन सुरुवात झाली आणि सुझुकी या पहिल्या परदेशी कंपनीला कार बनवण्याची परवानगी मिळाली. यानंतर एकामागून एक कार आणि व्यावसायिक वाहने बनवणार्‍या कंपन्यांच्या रांगा लागल्या. उत्पादन वाढू लागले आणि रोजगारही वाढला. नवीन शतकाच्या आगमनानंतर, ऑटोमोबाईल उद्योगाला गती मिळू लागली आणि सर्व कार कंपन्या प्रगत मॉडेलच्या कारसह बाजारात प्रवेश करू लागल्या. परिस्थिती अशी होती की, ज्या गाड्या आधी केवळ परदेशात लॉन्च झाल्या होत्या, त्या भारतातही येऊ लागल्या आणि गाड्यांची विक्री सातत्याने वाढू लागली.

भारतात कार बनवाव्या हे सरकारचे धोरण यशस्वी ठरले. यासाठी विविध राज्यांनी विशेषत: गुजरात आणि तामिळनाडू यांनी त्यांना स्वस्त दरात जमीन देण्यासह इतर अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्या कंपन्यांना निर्यात प्रोत्साहनही देण्यात आले. त्यामुळे भारत वाहन निर्यात करणारा देश म्हणून जागतिक पटलावर नावारूपाला आला. नागरिकांमधील चारचाकींविषयीचे वाढते आकर्षण आणि वाढत जाणारा उत्पन्नस्तर लक्षात घेऊन, देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी, तसेच वित्तसंस्थांनी कार आणि दुचाकींसाठी कर्ज देण्यास सुरुवात केली. यामुळे वाहने घेणे सोपे झाले.

अलीकडेच फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनने ऑगस्ट 2023 मध्ये विकल्या गेलेल्या वाहनांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, ऑगस्ट महिन्यात भारतीय वाहन बाजारात वार्षिक आधारावर 8.63 टक्के वाढीसह 18 लाख 18 हजार 647 वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 16 लाख 74 हजार 162 वाहनांची विक्री झाली होती. तीनचाकी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक 66.15 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात देशात एकूण 60 हजार 132 तीनचाकी वाहनांची विक्री झाली आहे.

आता इलेक्ट्रिक मोटारींच्या निर्मितीमध्ये आणि तंत्रज्ञानात सातत्याने होत असलेल्या सुधारणांमुळे भारतीय वाहन उद्योगाला नवे पंख लाभले आहेत. चालू वर्षात भारतात एकूण 29 लाख मोटारींचे उत्पादन केले जाईल, अशी शक्यता असून 2030 पर्यंत हा आकडा तीन कोटींवर जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमध्ये ज्या वेगाने भारताने बाजी मारली आहे, ती निश्चितच उल्लेखनीय आहे. टाटा मोटर्सने याची सुरुवात केली आहे आणि आता प्रत्येक ऑटोमोबाईल कंपनी इलेक्ट्रिक कार बनवण्याची किंवा बनवण्याच्या तयारीत आहे. टेस्लासारख्या कार कंपन्यांनीही भारतात कार बनवण्याचे मान्य केले आहे. देशाच्या जीडीपीला चालना देण्यात ऑटोमोबाईल उद्योगाचे मोठे योगदान असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये ते 7.1 टक्के आणि उत्पादन जीडीपीमध्ये 49 टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. सद्य:स्थिती वाहन उद्योग सुमारे दोन कोटी लोकांना रोजगार देत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news