पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताला अणुबॉम्बच्या धमक्या देणारा पाकिस्तान मोठ्या आर्थिक गर्तेत (Inflation In Pakistan) अडकत चालला आहे. देशातील परकीय चलनाच्या साठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे पाकिस्तान आता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकत नाही. लोकांची क्रयशक्ती सातत्याने कमी होत आहे. महागाई गगनाला पोहोचली आहे. वीज आणि पेट्रोलियम पदार्थांची बचत करण्यासाठी सरकारने बाजार लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये श्रीलंकेत ओढवलेली परिस्थिती आता पाकिस्तानमध्येही पाहायला मिळत आहे.
मागणी आणि पुरवठ्यातील तुटवड्यामुळे जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमतीत ५५.९३ टक्के वाढ (Inflation In Pakistan) नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव ४१५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत चहा ६४ टक्के आणि गहू ५८ टक्क्यांनी महागला आहे.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीही देश कठीण काळातून जात असल्याचे मान्य केले आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थ, स्वयंपाकाचा गॅस, वीज यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात महागाई गगनाला भिडत आहे. पाकिस्तान सांख्यिकी ब्युरोने सोमवारी जारी केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर 2022 मध्ये देशातील CPI-आधारित महागाई दर 24.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 12.3 टक्के होता. अहवालानुसार, बहुतांश जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
केवळ डिसेंबर महिन्यातच खाद्यपदार्थ एक चतुर्थांशपेक्षा जास्त महागले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत ५५.९३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कांद्याचे भाव ४१५ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत चहा ६४ टक्के आणि गहू ५८ टक्क्यांनी महागला आहे. तूप आणि खाद्यतेलाच्या दरात ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दूध आणि तांदूळ अनुक्रमे २६ टक्के आणि ४७ टक्क्यांनी महागले आहेत.
पाकिस्तानमधील चलनवाढीचा फटका अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतींवरही बसला आहे, जे जवळपास 35 टक्क्यांनी महागले आहेत. तर कपडे आणि पादत्राणांच्या किमती 17.22 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये चिकनची विक्री 650-700 रुपये किलोपर्यंत सुरू झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काही दिवसांत ते चिकन 800 रुपये किलोपर्यंत पोहोचू शकते.
एलपीजी गॅसबद्दल बोलायचे तर, एक व्यावसायिक गॅस सिलिंडर 10,000 पाकिस्तानी रुपयांना उपलब्ध आहे. बळजबरीने लोक धोका पत्करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गॅस भरून वापरत आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होऊन लोक जखमी होत आहेत.
पाकिस्तानने मंगळवारी ऊर्जेच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी बाजार आणि लग्न हॉल लवकर बंद करण्याची घोषणा केली आहे. विजेचा वापर रोखण्यासाठी आणि आयात तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, बाजार रात्री 8.30 वाजता बंद होतील, तर विवाह हॉल रात्री 10.00 वाजता बंद होतील, यामुळे आमचे 60 अब्ज रुपयांची बचत होईल.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, 1 फेब्रुवारीपासून जास्त वीज वापर असलेल्या बल्बचे उत्पादन बंद केले जाईल. जुलै महिन्यापासून अधिक वीजवापर असलेल्या पंख्यांची निर्मितीही बंद करण्यात येणार आहे. या उपाययोजनांमुळे 22 अब्ज रुपयांची आणखी बचत होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचलंत का ?