अमरावती, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार देवेंद्र भूयार यांनी दिलेल्या मुलाखतीने खळबळ उडाली आहे. विश्वासात घेतले तर स्वाभिमानीसोबत, विश्वासात घेतले नाहीतर त्यांच्याशिवाय, असे म्हणत भूयार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरूड येथे आयोजित स्वाभिमानीच्या कार्यक्रमाच्या फलकावरुन आमदार देवेंद्र भूयार यांचे नाव गायब झाले आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी हे विधान केले आहे.
स्वाभिमान शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्वेसर्वा राजू शेट्टी यांना माहितीच नाही. राजू शेट्टी यांच्या अवतीभवती असलेल्या लोकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहे. आयोजक मंडळींनी सूचना दिली, तरी अधिवेशन सुरू असल्याने कार्यक्रमास जाऊ शकणार नाही. गावात असतो तर शंभर टक्के कार्यक्रमात गेलो असतो. राजू शेट्टी यांच्या संपर्कात आहे, यात शंका नाही. मूळात संघटना कोणत्या विषयावर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार याबाबत स्पष्टता नाही. भाजपची सत्ता असताना अनेक विषय प्रलंबित होते. त्यावेळेस न सुटलेले विषय महाविकास आघाडी सरकारने सोडविले आहे. किमान समान कार्यक्रमातून प्रमुख मुद्दे सोडविण्यात आले. यात विजेचा प्रमुख मुद्दा आहे. तो केंद्र व राज्य समन्वयाने सोडविला. बाहेर पडायचे की नाही, हा कार्यकारणीचा विषय असल्याचे भूयार म्हणाले.
हेही वाचलंत का ? :
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie