मधुमेहाशी दोन हात करताना….

मधुमेह
मधुमेह
Published on
Updated on

डॉ. भारत लुणावत : मधुमेह हा आजकाल कोणत्याही वयात आणि कोणत्याही जीवनशैलीत आढळणारा रोग आहे. जगात सगळ्यात जास्त मधुमेहींची संख्या भारतात आहे. त्यावर ठोस असा उपाय नाही; पण या रोगात काळजी घेणे फार आवश्यक आहे. आहार, विहार आणि व्यायाम यांचे संतुलन राखले, तर मधुमेहावरही नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी, मधुमेही रोग्यांची देखभाल करताना घरातील व्यतींनी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी थोडंसं….

मधुमेह हा शब्द उच्चारला की, लगेच डोक्यात अनेक कल्पना येतात. हा रोग दिसायला अत्यंत साधा असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी असतात. अनेक रोगांचे हे मूळ आहे, असंही म्हणायला हरकत नाही. उलट मधुमेह झाला की, अन्य अवयवांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो. त्यामुळे या रोगात सर्व बाजूंनी काळजी घ्यायला हवी. आहार, विहार आणि व्यायाम यात योग्य संतुलन राखलं, तर मधुमेहावरही विजय मिळवता येऊ शकतो. विशेषत: खाण्यापिण्यात केलेली थोडीही हलगर्जी रोग्याला जड जाऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला मानून योग्य ते उपचार आणि जीवनशैली अंगी बाणवली, तर या रोगावर विजय मिळवणं सहज शक्य आहे. वेळेवर औषध घेण्याइतकंच इथे योग्य आणि रोजच्या व्यायामाला महत्त्व आहे. खाण्यावर नियंत्रण आणि डायट चार्टचं तंतोतंत पालन केलं तर या रोगामुळे शरीरातील अन्य अवयव कमकुवत करण्याची शक्ती कमी करण्याची शक्यता कमी करता येईल.

मधुमेहाशी सामना करताना लक्षात ठेवायला हवं की, काळजी न करता काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. मधुमेहात काही गोष्टी आवर्जून कराव्यात. उदा. डायट चार्ट बनवून आहार घेतला पाहिजे. यात प्रत्यक्षात डाएट चार्ट बनवून तो डोळ्यांसमोर ठेवणं अधिक श्रेयस्कर आहे. बऱ्याच गोष्टी केवळ मनाशी ठरवून पार पडत नाहीत; पण तेच जर त्याच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली, तर मनावर त्या गोष्टी पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी वाढते. त्यामुळे डाएट चार्ट बनवून त्याप्रमाणे आहार ठेवावा. याचा आणखी एक फायदा असा होतो की, योग्य पोषकतत्त्वे शरीरात जातात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थही पोटात जातात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शारीरिक सक्रीयता. मधुमेह हा काही शरीराला विश्रांती देण्यासारखा आजार नाही, उलट यात शारीरिक सक्रियता जितकी अधिक तितकी रोग्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. नियमित व्यायामाने मधुमेहाशी दोन हात करायला सोपं जातं. मधुमेहाचं एक कारण बदलती जीवनशैली आणि त्यामुळे येणारी स्थुलता हेही आहे. ती कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवायला हव्यात.

व्यायामाइतकंच औषधांनाही महत्त्व आहे. कारण, त्यांच्याशिवाय मधुमेहाला हरवणं सोपं नाही. केवळ साखर न खाऊन मधुमेह टाळता येत नाही. कारण, शरीरातील इन्शुलिन तयार करण्याची शक्ती कमी झाल्याने ती भरून काढण्यासाठी औषधांचीही गरज असते. वेळेवर औषधे घेणे आणि ती योग्य प्रमाणात घेणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. अनेकदा सुरुवातीला रोगी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे सुरू करताना दिसतात. नंतर काही काळाने आपल्या मनाने त्याचे प्रमाण कमी-जास्त करतात. त्यांना वाटते की साखरेचे प्रमाण आटोक्यात आले की, औषधांचे प्रमाणही कमी केले तरी चालते; पण तसे घडत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोष्टी कराव्यात. नाही तर त्याचा परिणाम अन्य कशात तरी होऊ शकतो. वेळेवर औषधे घेण्याचीही गरज आहे. जेवणाअगोदर किंवा नंतर किती काळाने औषध घ्यायचे आहे, हे लक्षात ठेवावे आणि त्या वेळेवर घ्यावे. कारण, पाचकरस कधी तयार होतात तशी औषधे घेतली, तर त्याचा चांगला फायदा होताना दिसतो.

वेळोवेळी रक्त आणि लघवीतील साखरेचे प्रमाण तपासणेही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी नियमित चाचण्या होईल. करणेही आवश्यक आहे. त्यातही योग्य ती वेळ पाळून चाचण्या केल्या, तर येणारे परिणाम अचूक राहतात. येणारे रिपोर्ट नीट जपून ठेवावेत. त्यांची डॉक्टरांना आवश्यकता भासू शकते. त्यातील चढउतारांचा आलेख पाहून काही गोष्टी ठरवणे सोपे जाते. डॉक्टरांच्या मते जे मधुमेही आपल्या शुगरवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात त्यांना मधुमेहामुळे होणारे इतर रोग होण्याची शक्यता कमी असते. मधुमेह असणाऱ्यांनी किटोन्स आणि हिमोग्लोबीनची चाचणीही करत राहावी.

आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याची सूची सतत डोळ्यांसमोर असू द्यावी…. मधुमेहींनी आहारात दूध, दही, पनीर, अंडी, मासे, सोयाबीन यांचं सेवन करावं. औषधे घेणाऱ्यांनी योग्य वेळेला खाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राहायला मदत होते. तळलेले पदार्थ, मिठाई, बेकरीचे पदार्थ (ज्यात मैद्याचं प्रमाण अधिक आहे.) मलईयुक्त पदार्थ टाळावेत. साय काढलेलं दूध उपयोगात आणू शकता.

कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला, तरी चालेल. तुमचं वय आणि शारीरिक क्षमता पाहून व्यायामाचा प्रकार ठरवता येऊ शकतो. रोज ४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यात चालणे, पळणे, डान्स करणे, सायकलिंग, एरोबिक्स अशा कोणत्याही प्रकारच्या व्यायामाचा समावेश करता येतो. टेकडी चढणे किंवा पोहणे हाही उत्तम व्यायाम होऊ शकतो. आठवड्यातील पाच दिवस पूर्ण व्यायाम झालाच पाहिजे. व्यायामामुळे शरीरातील चरबी कमी होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहायलाही मदत होते. अशाप्रकारे सगळ्या पातळ्यांवर मधुमेहाशी सामना केला, तर त्याची तीव्रता कमी करायला नक्कीच मदत होईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news