पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्या उद्भवल्यानंतर घरून काम करण्याची ( वर्क फ्रॉम होम ) परवानगी देण्यात येते, अशी माहिती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली. बंगळुरू येथे राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते.
"सर्वोच्च न्यायालयात गेल्या वर्षी पाच पैकी चार क्लर्क या महिला होत्या. त्यांनी मला फोन करुन मासिक पाळीच्या वेदना आहेत, असे सांगितले. त्यानंतर मी त्यांना 'कृपया घरून काम करा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या' असे म्हटले होते. आम्ही सर्वोच्च न्यायालयात महिला शौचालयांमध्ये स्वच्छता पॅड डिस्पेंसर देखील उपलब्ध करून दिले आहेत," असेही चंद्रचूड या वेळी म्हणाले.
चंद्रचूड यांनी कायदा पदवीधरांना करिअर मार्ग निवडण्याबाबत असलेल्या समस्यांवर देखील प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी कायदा क्षेत्रातील एका विशिष्ट मार्गावर करियर निवडण्याची घाई करु नये, त्याऐवजी या क्षेत्रातील सर्व संभाव्य मार्गांचा शोध घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. "आपले आयुष्य खुप मोठे आहे. कायदा क्षेत्रातील समस्या आणि संधी शोधण्यासाठी काही वर्षे खर्च केल्यास तुमचा तोटा होणार नाही. प्रत्येक नोकरी तुम्हाला दुसर्या नोकरीमध्ये हस्तांतरित करता येण्याजोग्या कौशल्य देईल.", असेही मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.