हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारात वीज कोसळून एका तरूणाचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. राजू शंकरराव जायभाये (वय २७) असे मृत तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. या शिवाय लक्ष्मणनाईकतांडा येथे शेतातील आखाड्यावरील दोन शेळ्या दगावल्या. तसेच अजरसोंडा येथे एका घराच्या बैठकीची भिंत कोसळून कापूस भिजून मोठे नुकसान झाले आहे.
हिंगोली जिल्हयात रविवारी मध्यरात्री पासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले भरून वाहू लागले आहेत. तूर, गहू या पिकांसाठी पाऊस फायदेशीर असला तरी हरभरा पिकाला या पावसाचा फटका बसणार आहे. या शिवाय संत्रा, मोसंबी बागांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील राजू शंकरराव जायभाये (वय २६) व त्यांचा मित्र विष्णू सिताराम नागरे (वय २५) हे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस येत असल्याने शेतात काढून ठेवलेले पीक झाकण्यासाठी जात होते. यावेळी पाऊस वाढल्याने ते एका ठिकाणी थांबले, यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र राजू जायभाये यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तर, विष्णू नागरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या शिवाय लक्ष्मणनाईकतांडा शिवारात योगीराज राठोड यांच्या शेतातील आखाड्यावर शेळ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्री वीज पडल्याने दोन शेळ्या दगावल्या आहेत. तर औंढा तालुक्यातील अजरसोंडा येथील शिवाजी कुंडलीक आहेर यांच्या घराच्या बैठकीची भिंत कोसळली. यामध्ये बैठकीत ठेवलेला कापूस पावसाने भिजल्याने नुकसान झाले आहे.
वसमत तालुक्यातील पिंपळाचौरे येथे झाड अंगावर पडून गाय दगावली, तर माळवटा शिवारात एक बैल दगावला आहे. जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करणे सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा :