बंडखोरी, नाराजी, रुसवे- फुगवे याचा शाप हातकणंगले व पूर्वीच्या इचलकरंजी मतदार संघालाआहे. कधी बंडखोरी, कधी अंतर्गत धुसफुस यातून हा मतदारसंघ क्वचितच सुटला. आताही भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांचे बंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शमविले, तरी त्याचे कवित्व मागे राहिले आहे. मात्र, आवाडे यांच्या बंडाच्या इशार्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा मार्ग निष्कंटक केला असला, तरी या मार्गावरून विजयपथापर्यंत जाण्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. विधानसभेची गणिते सुरू झाली आहेत. प्रकाश आवाडे यांनी भाजपकडून आपली उमेदवारी आताच निश्चित केल्याची चर्चा आहे. (Hatkanangle Lok Sabha Election)
हातकणंगले किंवा इचलकरंजी या मतदार संघात 1989 साली बंडखोरीने राजकारण ढवळून निघाले. माने यांच्या सततच्या विजयाने काही साखर कारखानदारांनी त्यांच्याविरोधात एकजूट केली. तेव्हा शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. सा. रे. पाटील यांचा तसेच त्यांच्याकडेही काँग्रेस मंडळींचा राबता असायचा. मात्र, त्यांच्या उमेदवारीची कुणकुण लागताच माने यांनी पाटील यांचा पक्ष कोणता, असा प्रश्न विचारला. मात्र, पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधील माने विरोधकांचे उघड पाठबळ होते. तेव्हा पाटील यांना 2 लाख 2 हजार 584 मते मिळाली होती, तर माने हे 2 लाख 75 हजार 674 मते मिळून विजयी झाले.
आताही भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरीची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंड थंड करत ते ज्यांच्याविरुद्ध ते बंड करणार होते, त्यांचाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना व्यासपीठावर आणले. शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारीचा मार्ग निष्कंटक केला आहे. आता जबाबदारी स्थानिक नेत्यांवर आहे. या मतदार संघात राजकीय बलाबल समसमान आहे. तीन आमदार महायुतीचे, तर तीन आमदार महाविकास आघाडीचे आहेत.
इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. तेथे सुरेश हाळवणकर हे भाजपचे माजी आमदार आहेत. भाजपची ताकद या मतदार संघात आहे. या मतदार संघाचे विशेषत: वस्त्रोद्योग व पिण्याच्या पाण्याचे वेगळे प्रश्न आहेत व त्यासाठी इचलकरंजीकर पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत. या प्रश्नातून मार्ग काढता आलेला नाही, हे सर्वपक्षीय अपयश आहे. बंडाचा झेंडा फडकविण्याचा इशारा देत आवाडे यांनी भाजपमधून आपली उमेदवारी पक्की केल्याचे मानले जाते. काँग्रेसकडून राहुल खंजिरे, शशांक बावचकर, संजय कांबळे हे दावेदार मानले जातात. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मदन कारंडे संधीच्या प्रतीक्षेत आहेत. तेथे गेल्यावेळी दानोळी योजनेला केलेल्या विरोधाचा फटका राजू शेट्टी यांना बसला. आता दूधगंगेतून पाणी देण्यास कागलकरांचा विरोध आहे. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आपला रोष व्यक्त केला होता.
हातकणंगले मतदार संघातून काँग्रेसचे राजूबाबा आवळे आमदार आहेत. हा मतदारसंघ काँग्रेस, जनसुराज्य व शिवसेना असा कायम फिरता राहिला आहे. तेथे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे लोकसभेसाठी इच्छुक होते. आता ते गोकुळचे संचालक आहेत. तसेच तेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. हे सगळे लक्षात घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मतदार संघाची धुरा सांभाळण्याचे आवाहन विनय कोरे यांना केले. येथे विनय कोरे व महाडिक यांची ताकद हीच महायुतीची ताकद असेल. भाजपकडून डॉ. अशोकराव माने तयारी करत आहेत.
शिरोळला राजू शेट्टी यांची ताकद असली, तरी तेथे गेल्या दोन विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. आताही अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर निवडून आले असले, तरी ते शिवसेना शिंदे गटात असल्याने महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नाराज असलेल्या यड्रावकर यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना भल्या पहाटे त्यांच्या घरी जावे लागले होते. यातूनच या मतदार संघातील चित्र समोर येते. येथे महायुती यड्रावकर व माधवराव घाटगे यांच्यावर अवलंबून आहे. काँग्रेसकडे दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील आहेत. ते तसेच शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यावर महाविकास आघाडीची मदार आहे.
शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे ठाकरे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तालुक्यातील उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल आपुलकी असणे नैसर्गिक आहे. तेथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे आमदार आहेत. त्यांच्यावरच महायुतीची या मतदार संघाची मदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी चर्चा करताना हे स्पष्ट केले. शाहूवाडीत स्थानिक उमेदवार असल्याने त्याचा फरक पडणार, हे नैसर्गिक आहे. तेथे गायकवाडांचे दोन गट, अमर पाटील यांचा गट यांचीही भूमिका महत्त्वाची असेल.
सरुडकर यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर हे शिराळ्याच्या नाईक सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. हा विधानसभा मतदारसंघ शाहूवाडीला लागून आहे. तेथे मानसिंगराव नाईक हे शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तेथे महायुतीला सम—ाट महाडिक, सत्यजित देशमुख यांच्यावरच विसंबून रहावे लागेल. (Hatkanangle Lok Sabha Election)
इस्लामपूरला शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार आहेत. त्यांनीच आपल्या उमेदवारीला विरोध केल्याचा राजू शेट्टी यांचा आक्षेप आहे. साखर कारखानदारांनी गट्टी करून ठाकरे शिवसेनेला आपल्याविरुद्ध उमेदवार उभा करायला लावल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीसाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. विशेषत: त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. महायुतीची भिस्त तेथे निशिकांत पाटील व गौरव नायकवडी यांच्यावर असेल.
संभाव्य बंड शमविण्यात मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मार्ग निष्कंटक केला. आता या मार्गावरून स्थानिक नेत्यांना लोकसभा गाठण्यासाठीचा प्रवास करायचा आहे. नाराजी, उणीदुणी सगळीकडेच असतात; पण ती किती ताणली जाणार, यावर येथील यश अवलंबून आहे.