Congress Rally : ‘है तय्यार हम’ काँग्रेस रॅलीची टॅगलाईन; २८ ला देशभरातून येणार कार्यकर्ते

File Photo
File Photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत येत्या २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये काँग्रेस पक्षाची महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीची 'है तय्यार हम! अशी टॅगलाईन असून एकप्रकारे रॅलीद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग काँग्रेस या माध्यमातून संघ मुख्यालयी फुंकणार आहे.

अमरावती रोडवरील दाभा की उमरेड रोडवरील दिघोरी या दोन जागांबाबत चर्चा सुरू होती, आज दिघोरी टोलनाका परिसरातील जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. विस्तीर्ण प्रांगण, पार्किंग, चौफेर महामार्गाला जोडणारे रस्ते या पार्श्वभूमीवर दिघोरीला पसंती दिली गेली. उद्या रविवारी केंद्रीय व प्रदेश निरीक्षक यांच्या उपस्थितीत देवडिया काँग्रेस भवनात आढावा बैठक होणार आहे. तीन राज्यातील अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यातून असणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत. याविषयी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या समनव्याने अनेकांना जबाबदारी दिली गेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांच्या मतांमध्ये भरघोस वाढ झाली. कर्नाटकनंतर काँग्रेसने तेलंगणातही स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशाची संसदही सुरक्षित राहिलेली नाही तर देश कसा सुरक्षित असेल असा प्रश्न काँग्रेसतर्फे उपस्थित केला जात आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या महारॅलीला देशभरातून १० लाख लोक उपस्थित राहतील असे नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुका तीन महिन्यांवरच असल्याने ही महारॅली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम करेल. नागपूरमध्ये होणारी महारॅली ऐतिहासिक व देशात परिवर्तनाचा संकेत देणारी ठरेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news