नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीची हिवाळी अधिवेशनापूर्वीची बैठक खूप चर्चेत आली आहे. गुरुवारपासून (दि. ७) सुरु होणाऱ्या नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अनुसरुन केलेली बॅनरबाजी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मविआच्या आजच्या बैठकीत लावलेले पोस्टर विशेषत: खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत पोकळ घोषणांचा धूर अशी बॅनरबाजी केलेली आहे.
गुरुवारपासून (दि. ७) नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असून आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधक बहिष्कार घालतील, असे संकेत आहेत. दुपारी सर्व विरोधी पक्षांची बैठक विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत लावलेल्या पोस्टरमध्ये रेल्वेचे ट्रिपल इंजिन पहायला मिळते. या इंजिनला नावे दिलेली आहेत. यातील एका इंजिनला आजारी सरकार, दुसरे खोके सरकार आणि तिसरे जाहिरातबाज सरकार असे अशी नावे दिलेली आहेत. तीनही इंजिनच्या समोर एका व्यक्तीने जीवन संपवल्याचे दिसून येते. यामध्ये एक बेरोजगार, एक शेतकरी आणि एक महिला अशा प्रतिकृती आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत लावलेले या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
या पोस्टरच्या माध्यमातून विविध मुद्यांवर सरकारला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धारेवर धरले. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळासह विरोधी पक्षांतील नेत्याचे नागपुरात आगमन झाले आहे. सायंकाळी ५ वाजता चहापानानंतर सायंकाळी साडेपाच वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. सत्तापक्षाच्या चहापानावर विरोधक बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेतही विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मिळाले आहेत. विशेषतः आरक्षण, राज्यातील अवकाळी पाऊस व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक भूमिका घेतील, असे दिसते. ओबीसी आरक्षणात मराठ्यांना सामावून घेण्यास होत असलेला विरोध अशा अनेक मुद्यांवर विरोधक सत्तापक्षाशी संघर्षाच्या तयारीत आहेत. दुसरीकडे अलिकडेच देशातील तीन राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे भाजप, मित्र पक्ष अधिवेशनाच्या बाबतीत हताश विरोधकांना यशस्वीपणे तोंड देऊ असे म्हणत निर्धास्त दिसत आहेत.