पुढारी ऑनलाइन डेस्क : अमेरिका युरोपमध्ये आलेल्या मंदीमुळे गेल्या काही दिवसात टेकनॉलॉजीच्या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. यामध्ये गुगलने Google देखील काही दिवसांपूर्वी कंपनीतून तब्बल 12000 कर्मचा-यांची कपात केली. मात्र, मंदीच्या झळा पाहता आता खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या स्वतःच्या पगारात देखील मोठी कपात होणार आहे, नुकत्याच झालेल्या टाऊन हॉल मधील मीटिंगनंतर हे सांगण्यात आले. मात्र, त्यांचा किती पगार कापला जाणार याविषयी काहीह स्पष्ट माहिती पिचाई यांनी सांगितलेली नाही. इंडिया टुडे ने याविषयी वृत्त दिले आहे.
सध्या झालेल्या टाऊन हॉलच्या मीटिंगमध्ये पिचाई यांनी सांगितले की, वरिष्ठ उपाध्यक्ष स्तरावरील सर्व भूमिकांमध्ये असलेल्या कर्मचा-यांच्या वार्षिक बोनसमध्ये लक्षणीय कपात राहील. तसेच ही कपात कंपनीच्या कामगिरीशी निगडीत असेल. थोडक्यात पिचाई यांच्यासह कंपनीतील सर्व वरिष्ठ पदावरील व्यक्तींच्या बोनसमध्ये मोठी कपात केली जाणार आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी पगारकपातबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. असे असले तरी त्यांच्या बोलण्यातून पगारातही कपात करणार असल्याचे स्पष्ट होते. तसेच पिचाई यांनी पगाराची टक्केवारी किती आणि किती काळ कापली जाईल याचा उल्लेख केला नाही.
पिचाई यांनी स्पष्टपणे सांगितले नसल्यामुळे वेगवेगळ्या अहवालानुसार त्यांच्या पगाराबाबत अंदाज बांधण्यात येत आहे. 2020 च्या फाइलिंगनुसार, गुगलचे Google सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार 2 दशलक्ष डॉलर (20 कोटी डॉलर) इतका असल्याचे उघड केले होते. मात्र, IIFL Hurun India Rich List 2022 नुसार, Google CEO ची एकूण संपत्ती 20 टक्क्यांनी घसरून 5,300 कोटी रुपये झाली. तथापि, यादीतील सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकांमध्ये पिचाई अजूनही आहे, असेही म्हटले आहे.
गुगलने Google टाळेबंदीची घोषणा करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी सुंदर पिचाई यांच्या पगारात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी, Google ची मूळ कंपनी Alphabet, बोर्डाने पिचाई यांची CEO म्हणून "मजबूत कामगिरी" ओळखली आणि सांगितले की पुरस्काराचा महत्त्वपूर्ण भाग अल्फाबेटच्या इतर S&P 100 कंपन्यांच्या तुलनेत एकूण भागधारक परताव्यावर अवलंबून असेल.
गुगलमधून काढून टाकलेल्या कर्मचा-यांनी सांगितले होते की ते टाळेबंदीसाठी तयार नाहीत आणि गुगलने अचानक सर्व अंतर्गत कार्यालय आणि गटांमधून त्यांचा प्रवेश काढून टाकला. काही कर्मचा-यांनी म्हटले आहे की त्यांना कंपनीत गेल्यानंतर आयडी जेव्हा हिरव्या ऐवजी रेड रंगात दिसला तेव्हा त्यांना कळाले की त्यांना काढून टाकण्यात आले आहे.
गुगलमधून Google ज्या 12000 कर्मचा-यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यापैकी अनेक जण जवळपास एक दशक किंवा त्याहून अधिक काळ काम करणारे होते. त्यामुळे अशा कर्मचा-यांना काढून टाकल्यामुळे अनेकांनी कर्मचारी कपात ही कार्यप्रदर्शन किंवा रेटिंगवर आधारित केली नव्हती, अशी तक्रार केली होती.
नुकत्याच टाऊन हॉलमध्ये झालेल्या बैठकीत पिचाई यांनी कर्मचारी कपातीबद्दल बोलताना हे स्पष्ट केले की कर्मचारी कपात ही रँडम नव्हती.
गुगल मधील टाळेबंदी युनायटेड स्टेट्समध्ये सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात भारतासह इतर बाजारपेठांमध्येही ही टाळेबंदी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.