पुणे; पुढारी वृत्तसेवा
पुणे येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली हाेती.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी, भाजपनं शक्तीप्रदर्शन करायचं ठरवलं तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. आजची ही गर्दी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा भगवा व रिपाइंचा निळा नक्की फडकवणार हे दिसून येते. ज्यांना भगव्याचा मान व सन्मान नाही, अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे बसले आहेत अशी खरमरीत टीका त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर केली.
जनतेच्या मनात केवळ आणि केवळ भाजप आहे. महापालिकेत भाजपने मागील पाच वर्षात सामान्य माणसासाठी काम केले. वर्षानुवर्षे महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसने जनतेला लुटण्याचे काम केले. आजवर जेवढे राष्ट्रीय रुरस्कार मिळाले नाहीत तेवढे पाच वर्षात मिळाले. त्यामुळे पुणेकर भविष्यातही विकासाच्या मागे जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोविडच्या काळा पुणे महापालिकेने उल्लेखनीय काम केले. मात्र राज्य शासनाने महापालिकेला कवडीची मदत केली नाही. पुन्हा सत्ता आल्यावर पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर करू अशी ग्वाही यावेळी दिली.
आणखी काय म्हणाले फडणवीस
प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील म्हणाले, पक्षाचं कार्यालय भव्य दिव्य व सुसज्य कार्यालय असायला हवे, ते लवकरच पूर्ण होईल, हे कार्यालय महापालिका निवडणुकीसाठी तात्पुरते आहे. गिरीष बापट यांनी संघर्षातून हा पक्ष वाढवला.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्षाची वाटचाल सुरू आहे. संघटनेची ताकद आणि महापालिकेत सत्ताधारी म्हणून मागील पाच वर्षात केलेले काम, या जोरावर महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी सेवसेनाच नव्हे तर आणखी काही पक्ष एकत्र आले तरीही महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार आहे. शहराचे नवे कार्यालय पुणेकरांच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरेल.