गिरगावकरांनी पाहिलेली ‘ती’ मंदिरे गेली कुठे?

गिरगावकरांनी पाहिलेली ‘ती’ मंदिरे गेली कुठे?

मुंबई : संजय कदम : देवी देवतांची मंदिरे हा गिरगावचा आत्मा. पण अनेक चाळी किंवा संपूर्ण वाडी विकत घेऊन, भूखंड एकत्रिकरण करून टोलेजंग टॉवर्स उभे करताना प्लॉटवरील मंदिरांचे संरक्षण-जतन-संवर्धन करण्याचे मात्र बिल्डर्स सोयीस्करपणे विसरू लागले आहेत. प्रकल्प रखडू लागल्याने अनेकजण बेघर झाले आहेत. पण सात-आठ पुनर्विकास प्रकल्पांमध्ये लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे गायब झाल्याची खंत, श्रद्धाळू आणि उत्सवप्रिय हीच गिरगावकर व्यक्त करीत आहेत.

राम नवमीला गिरगावच्या राम मंदिरांमध्ये येऊन सुंठवड्याचा प्रसाद ग्रहण केला नाही, असा मुंबईकर विरळाच. लाखो गणेश भक्तांनी फडकेवाडीच्या मंदिरात अंगारिका संकष्टी चतुर्थी साजरी केली आहे. फणसवाडीच्या व्यंकटेश मंदिरात नवस फेडायला भारतभरातून लोक येतात. विठ्ठल-रखुमाई मंदिरांमध्ये सर्व एकादशा मोठ्या भक्तीभावाने साजर्‍या होतात. हजारो भक्त नामस्मरणासाठी दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात येतात. लक्ष्मीनारायणाच्या देवळात तर गिरगावकरांची नित्य पूजा असते.

गिरगावातल्या जवळपास सर्वच इमारती या 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जुन्या आहेत. 1995 पासून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला. चाळींच्या ठिकाणी मोठमोठे टॉवर्स येऊ लागले. काही प्रकल्प अर्धवट असल्याने तेथील लोक बेघर झाले आहेत. काहींच्या वर्षानुवर्षे नुसत्या बैठकाच सुरू आहेत. अजुनही अनेक जुन्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेेत आहेत. या चाळींच्या नाकानाक्यावर मंदिर हे गिरगावचे वैशिष्ट्य. पण प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संमती पत्रे घेताना भाडेकरूंना मंदिर पुनर्स्थापित करण्याची खोटी आश्वासने देऊन बिल्डर्स फसवू लागले आहेत. यामुळे गिरगावकर जनतेमध्ये आक्रोश व संतापाचे वातावरण आहे.

गिरगावातील मंदिरे हा मागील पिढ्यांकडून मिळालेला मूर्त सांस्कृतिक वारसा आहे. गिरगावचा हा वारसा जपण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने उचलावी, अशी समस्त गिरगावकरांची मागणी आहे. प्राचीन काळापासून सांस्कृतिक वारसा संपत्तीचा आदर केला जातो. गिरगावातील अतिप्राचीन मंदिरांचे संरक्षण, जतन आणि संवर्धनासाठी शासनाने सर्वेक्षण करावे व या प्राचीन मंदिरांची ऐतिहासिक ओळख, यादी, प्रतवारी इत्यादी माहिती जाहीर करावी. तसेच या देवळांचा समावेश हेरिटेज यादीत करून त्यांच्या जीर्णोद्धारासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, या गिरगावकरांच्या मागण्या आहेत.

ही मंदिरे गेली कुठे ?

अमृतवाडी येथील प्राचीन शिवमंदिर, श्री स्वामी समर्थ नगर मुगभाट येथील प्राचीन ओमकारेश्वर मंदिर, डी वॉर्ड कंपाऊंड येथील श्री हनुमान मंदिर, फॉर्जेट स्ट्रीट ताडदेव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, ताडदेव कंपाऊंड येथील श्री हनुमान मंदिर ही मंदिरे पाडण्यात आली आहेत.

वैद्यवाडी ठाकूरद्वार येथील विठ्ठल रखुमाई मंदिरासंदर्भात सध्या कोर्टात केस चालू आहे. विठ्ठल रखुमाई मंदिर 1760 मधील असल्याचा पुरावा होता तो शिलालेख गायब केला गेला आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने हे मंदिर प्राचीन असल्याचा निर्वाळा दिला आहे. बिल्डरने देऊळ पाडण्याचा घाट घातला होता तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनेच कोर्टात केस लढवली जात आहे. श्री विठ्ठल रखुमाई मंदिराला ऐतिहासिक वारसा सुद्धा आहे. कारण येथे लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, क्रांतिकारक चाफेकर बंधू येथे भेट देत असत.

काय म्हणतात गिरगावकर ?

1 गृहनिर्माण प्रकल्पातील प्रत्येक देवळाचे संरक्षण, जतन, संवर्धन होण्यासाठी भाडेकरू-बिल्डर-मुंबई महानगरपालिका/म्हाडा असा विशेष त्रिपक्षीय करार अनिवार्य केला जावा.
2 सर्व मंदिरांशी संबंधित शिलालेख, दीपस्तंभ, लिखित साहित्य, मंदिरातील जुन्या वस्तू, मंदिरांचे पुजारी, मंदिरातील मूर्ती, मंदिरांचे जुने दस्तावेज, यांची माहिती घेऊन ती सार्वजनिक करावी.
3 सर्व मंदिरांच्या कायमच्या देखभाल आणि दिवाबत्तीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्ड कार्यालयात स्वतंत्र विभाग असावा.
4 पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्यातील नकाशांमध्ये भूखंडावरील देऊळ कुठे प्रस्थापित केले जाणार आहे याची अचूक माहिती देणे बिल्डरला अनिवार्य करावे.
5 पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर देवळाच्या देखभालीसाठी वेगळा कॉर्पस फंड बिल्डरने रहिवाशांना देण्याची सक्ती करावी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news