कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आणि श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे मांसाहार करता येणार नाही, हे लक्षात घेऊन खवय्यांची मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी होत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस होता. पण आजच एकादशी असल्याने अनेकांना मांसाहार बेत रद्द करावा लागला, पण पुढील तीन ते चार दिवसांत मांसाहारी जेवणाचे आयोजन करता येईल, या उद्देशाने कोंबडी खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होती.
सध्या ब—ॉयलर कोंबडीचे दर कमी झाले आहेत. पण, गावरान कोंबडीचे दर तेजीत आहेत. गावरान कोंबडीचा दर 500 रुपये तर बॉयलर कोंबडीचे 100 ते 120 रुपये असा होता. मटणाचा दर मात्र 650 रुपयेच आहे. शुक्रवार, दि. 29 पासून श्रावण सुरू होत आहे. श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास, तसेच अन्य सण साजरे केले जातात. त्यामुळे मांसाहार केला जात नाही. ही बाब लक्षात घेऊन अमावस्येपर्यंत मांसाहार केला जातो. दरम्यान, बुधवारी जरी गटारी अमावस्या असली तरी सोमवारी अनेक कुटुंबांच्या घरी मटण आणले जात नाही. त्यामुळे मांसाहारासाठी मंगळवार, बुधवार हे दोनच दिवस मिळणार आहेत.
पण नोकरी, व्यवसायानिमित्ताने बाहेर असलेल्यांना मटण आणणे शक्य होत नाही, त्यांनी चिकनवर जोर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अनेकांनी रविवारच्या बाजारात कोंबडी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. बाजारात कोंबड्याचा दर 500 ते 600 रुपये असा होता. तर लहान पिल्लांचा दर 200 ते 250 असा होता. चिकनचा दर कमी झाला आहे. बॉयलर कोंबड्याचा दर 100 ते 120 रुपये असा झाला आहे. त्यामुळे खवय्याची चंगळ आहे.