anil deshmukh arrest : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

अनिल देशमुख
अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि मध्यरात्रीनंतर त्यांना अटक करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. (anil deshmukh arrest)

ही कारवाई रोखण्याची न्यायालयीन लढाई हरल्यानंतर देशमुख अखेर सोमवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी वकीलासह ईडी समोर हजर झाले. तब्बल तेरा तास त्यांची चौकशी चालली. मध्यरात्र उलटली, 1 वाजला तरी ईडी कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर त्यांची चौकशी सुरूच होती तेव्हाच या अटकेचे संकेत मिळाले होते. ही चौकशी सुरू असतानाच ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार दिल्लीहून तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनीच देशमुख यांच्या अटकेला दुजोरा दिला. मंगळवारी दुपारी देशमुख यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.

anil deshmukh arrest : मी स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर

परमबीर यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल केला. याच आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करुन ईडीनेही तपास सुरू केला. ईडीने यापूर्वी देशमुखांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. रविवारी बदल्यांसाठी देशमुखांचा मध्यस्थ म्हणून काम करणारा संतोष शंकर जगतापलाही अटक झाली.

ईडीने या प्रकरणात 14 जणांविरोधात दाखल केलेल्या सुमारे 4 हजार 500 पानी आरोपपत्रात मात्र, देशमुखांचे नाव नाही. वारंवार समन्स बजावूनही देशमुख हे चौकशीला हजर राहीले नाहीत. देशमुखांची चौकशीच झालेली नसल्याने त्यांचा नेमका सहभाग स्पष्ट होत नसल्याने या आरोपपत्रात त्याचे नाव नसल्याचे ईडीने सांगितले होते.

परमबीर कुठे आहेत?

माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग हे आहेत कुठे, असा सवालही देशमुख यांनी केला आहे. आपली बाजू मांडणारा त्यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. ते म्हणाले, मला जेव्हा 'ईडी'चा समन्स आले तेव्हा मी 'ईडी'ला सहकार्य करत नाही, अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा मला 'ईडी'चा समन्स आले तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवले की, माझी याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे. त्याची सुनावणी चालू आहे.

मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः 'ईडी'च्या ऑफिसमध्ये येईन. मी स्वतः दोन वेळा सीबीआयच्या कार्यालयात जाऊन माझा जबाब दिला. मात्र, ईडीबद्दल अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आज मी स्वतः 'ईडी'च्या कार्यालयात हजर झालो आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news