Food : मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’

Food : मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’
पुढारी ऑनलाइन डेस्क : एखाद्या गावाची वाट तिथं खायला काय मिळतं यावरून लवकर सापडते. कुंदा या पदार्थानं बेळगावची वाट शोधायला आपल्याला मदत केली. पण ही दुधापासून बनणारी मिठाई बेळगावमधे तयार झाली कशी याची गोष्ट मात्र मोठी गमतीदार आहे. दुष्काळाला कंटाळून बेळगावमधे आलेल्या मारवाड्यांनी चुकून या मिठाईला जन्म दिलाय. या कुंदाच्या जन्माची गोष्ट सांगणारी पूजा भडांगे यांची ही फेसबूक पोस्ट. Food

जगात जी काही सुंदर शहरं असतील तर त्यात बेळगावचा समावेश नक्की होईल. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरचं आटोपशीर गाव. शांत आल्हाददायक वातावरण, लाल मातीचे रस्ते, गर्द झाडी. कानडी झाक असलेल्या मराठीत बोलणारी गोड माणसं. बेळगावच्या मातीत असलेला गोडवा इथल्या एका रेसिपीत उतरलाय. ही रेसिपी म्हणजे बेळगावचा 'कुंदा' Food

भारतीय वंशाच्या रेस्टॉरंट मालकाने अंतराळात पाठवला समोसा

बेळगावची ओळख म्हणजे इथला गोड कुंदा. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बेळगावला जाऊन कुंदा न घेता आलं तर फाऊल मानलं जावं, इतकं कुंद्याचं बेळगावशी नातं जोडलेलंय. पण या कुंद्याची जन्मकथासुद्धा खूप गमतीशीर आहे.

Food बेळगावात आली मारवाडी मिठाई

गोष्ट आहे ७०-८० वर्षांपूर्वीची. तेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. 'जहां न जाये गाडी वहां पे जाये मारवाडी' असं म्हणतात. तसं या काळात मारवाडी समाज दुष्काळी राजस्थानमधून व्यवसायाच्या निमित्ताने राज्याबाहेर पडला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचला. अगदी दुधात साखर मिसळावी असा विरघळून गेला.

अशाच मारवाडी समाजातली काही कुटुंब बेळगाव जवळच्या शहापूर इथं रहायला आले होते. यातल्या गंगाराम नावाच्या व्यक्तीचं गजानन मिठाईचं दुकान होतं. या दुकानात जक्कू महाराज नावाचा एक आचारी होता. गंगाराम यांनी त्याला राजस्थानवरून आपल्या मदतीसाठी बोलवून घेतलं होतं. जक्कू मारवाडी मिठाई बनवण्याच्या कामात तरबेज होते. त्यांच्या हाताला चव होती. डोकं प्रचंड हुशार असलं तरी जरासे आळशी होते.

एकदा ते कशासाठी लागेल म्हणून दूध तापवत होते. तो जमाना स्टोवचा होता. जक्कू महाराज स्टोववर दूध ठेवून दुकानातल्या कामासाठी बाहेर गेले. परतल्यावर पाहतात तर काय दूध आटून घट्ट बनलं होतं. स्टोवचं बटन बंद करायलाच ते विसरले होते. जक्कू घाबरले. स्वतःच्या निष्काळजीपणाला त्यांनी खंडीभर शिव्या घातल्या. गंगाराम शेटजीला कळल्यावर दंगा होणार हे ओळखून या आटलेल्या दुधाची काहीतरी विल्हेवाट लावायचं त्यांनी ठरवलं.

Food लेकीचं नाव दिलं मिठाईला

इथं जक्कू महाराजांची हुशारी कामी आली. त्यांनी गंडलेल्या दुधाची टेस्ट पाहिली. ते दूध गोड लागत होतं. याच दुधात त्याने खवा मिसळला. आणखी काही तास ते मिश्रण ढवळलं. एवढी सगळी उसाभर केल्यावर तयार झाली एक गोड खास चवीची मिठाई.

जक्कू यांनी दूध आटवलं म्हणून त्याला रागवायला आलेल्या गंगाराम शेटजी यांनी बनलेली मिठाई चाखली तेव्हा त्यांना ती प्रचंड आवडली. जक्कूवर ते प्रचंड खुश झाले. ही नवी मिठाई त्यांनी आपल्या दुकानात विकायला ठेवायचं ठरवलं. पण त्यापूर्वी मिठाईला नाव दिलं पाहिजे.

जक्कू मारवाड्याने आपल्या लाडक्या लेकीचं नाव या मिठाईला दिलं. हाच तो जगप्रसिद्ध 'कुंदा.' साजूक पौष्टिक 'कुंदा' अगदी थोड्याच दिवसात फेमस झाला. मारवाडी पुरोहित मिठाई दुकानात तो हमखास मिळू लागला. त्यात अनेक प्रयोग करून त्याची चव वाढवली.

Food ६०० किलो कुंदा रोज

काजू बदाम घातलेला खमंग 'कुंदा' बेळगाव बाहेरच्या लोकांनादेखील भयानक आवडला. कित्येकांनी तो बनवण्याचा प्रयत्नही केला. पण सुपीक बेळगावच्या गाईम्हैशींच्या दुधाला चव आहे की काय माहीत! तिथे बनणारा 'कुंदा' बाहेर कुठेही तसा बनत नाही.

गेली अनेक वर्षे शहापूरमधलं ते गजानन मिठाईचं दुकान आजही तितकंच फेमस आहे. जवळपास २०० दुकानात 'कुंदा' मिळतो. एका दुकानात रोज शेकडो लिटर दुधापासून ६०० किलो 'कुंदा' बनतो. म्हणजे थोडं गणित घातलं तर कित्येक टन 'कुंदा' बेळगावमधे तयार होतो आणि खपतो.

बेळगावच्या स्टेशनवर शिरणाऱ्या रेल्वेच्या डब्ब्यात पहिल्यांदा कुंदयाचा घमघमाट पसरतो. प्रत्येक प्रवासी कुंदयाचा एखादं पाकीट घेतल्याशिवाय बेळगावच्या बाहेर पाऊल टाकत नाही. आता तर कुंदा सातासमुद्रापार पोहचलाय. बेळगावला त्याने कुंदानगरी अशी ओळख बनवून दिलीय. गरमागरम कुंदा, त्याची जिभेवर रेंगाळणारी चव बेळगावच्या खाद्यसंस्कृतीचं तिथल्या हौशी लोकांच्या रसिकतेचं प्रतीक बनली आहे हे नक्की!

इडली- इंडोनेशियातून येऊन भारतात सुखाने नांदणारी मुलगी

नाशिक : निफाडला पूराच्या पाण्यात वाहून गेली तरुणी, आश्रमशाळेजवळ सापडला मृतदेह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news